(रत्नागिरी)
वाटद एमआयडीसीसाठी भूसंपादन प्रक्रिया वेगात होऊ लागली आहे. तालुक्यातील कोळीसरे येथे दुसऱ्या दिवशी ८० एकर जमिनीची मोजणीही ग्रामस्थांच्या सहकार्याने कडेकोट पोलिस बंदोबस्तात करण्यात आली. मात्र या मोजणीवेळी वाटद एमआयडीसी संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यात आले.
वाटद एमआयडीसीमध्ये वाटद, मिरवणे, कळझोंडी, कोळीसरे आणि गडनरळ या पाच गावांतील ९०४.५८ हेक्टर इतके क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून संयुक्त मोजणीला गेल्या गुरुवारपासून झाला आहे. यादिवशी कळझोंडी येथील १५ एकर जमिनीची मोजणी करण्यात आली.
सोमवारी पुन्हा भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी कोळीसरे येथे कडेकोट पोलिस बंदोबस्तात मोजणीला सुरुवात केली. या दिवशी ६० एकर जमिनीची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी ८० एकर जमिनीची मोजणी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने दि. 24/02/2025 च्या संयुक्त मोजणीला जमीन मालक, शेतकरी, ग्रामस्थ यांचा विरोध असल्याबाबत वाटद MIDC शेतकरी संघर्ष समितीतर्फे अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपअधिक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी यांच्याकडून दि. 12/02/2025 या दिवशी संयुकत मोजणीसाठी काढण्यात आलेल्या नोटीस या येथील जमिन मालक, शेतकरी, ग्रामस्थ, स्थानिक ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता उपअधिक्षक भूमी अभिलेख यांनी पाठवलेल्या आहेत. भारतीय संविधानाला पायदळी तुडवून, येथील येभील स्थानिक, जमिनमालक, शेतकरी ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांना विश्वासात न घेता उपअधिक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औदयोगिक विकास उपविभागीय रनागिरी हे आम्हा ग्रामस्थांच्या भावनाशी खेळत आहेत, असे दिसून येत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे दि. 24/02/2025 रोजी लावण्यात आलेल्या संयुक्त मोजणीला येथील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, जमीनमालक यांचा कडाडून विरोध आहे. आम्हा ग्रामस्थाचा विरोध डावलून जर हि मोजणी केली गेली तर आम्ही सर्व ग्रामस्थ आपल्या जमिनीमध्ये शेतामध्ये आत्मदहन करू आणि याला सर्वस्वी जबाबदार उपअधिक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ रत्नागिरी व उपविभागीय अधिकारी कार्यालय रत्नागिरी हे जाबाबदार राहतील यांची नोंद घ्यावी तसेच ग्रामस्थांचा विरोध लक्षात होता दि. 24/02/2025 रोजीची संयुक्त मोजणी तत्काळ थांबवावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.