( देवरुख / वार्ताहर )
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, पुणे यांनी आयोजित केलेल्या “राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा इलेव्हेट-२५” मधील कॅरम स्पर्धेत देवरुखचा अर्णव विनायक कुलकर्णी हा एकेरी प्रकारात विजेता ठरला आहे. अर्णव कुलकर्णी याने हे राष्ट्रीय स्तरावरील यश प्राप्त करून देवरुख नगरीच्या नावलौकिकात भर घातली असून, कॅरम खेळाच्या यशाची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. अर्णवला विजेत्यापदाच्या चषकासह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन आयोजकांकडून गौरविण्यात आले.
अर्णव कुलकर्णी देवरुख येथील वरची आळीचा मूळ रहिवासी आहे. अर्णवचे वडील विनायक श्रीकांत कुलकर्णी हे ॲडलर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, साडवली येथे मार्केटिंग कॉर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत, तर आई संज्ञा या निष्णात ड्रेस डिझायनर आहेत.
अर्णव सध्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधील बॅचलर इन इंजिनिअरिंगच्या(बी. ई.) द्वितीय वर्षाचे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेत आहे. त्याचे प्रार्थमिक शिक्षण आदर्श छत्रपती शिवाजी विद्यामंदिर पू. प्रा. शाळा नं.४, तर माध्यमिक एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, देवरुख आणि एच. एस. सी. पर्यंतचे शिक्षण पुण्यातील सुप्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमधून झाले आहे. अर्णवला कॅरमचे प्राथमिक धडे वडील विनायक कुलकर्णी यांनी दिले, तर रवींद्र कुलकर्णी, दामोदर घाणेकर, निनाद देसाई, योगेश साठे, पंकज खरात, योगेश आणि विजय कोंडविलकर यांचे नियमित सराव व मार्गदर्शन लाभते. अर्णवने मिळवलेल्या यशाचे देवरुख परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.