(गणपतीपुळे / वैभव पवार)
क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय टेनिस क्रिकेट शालेय स्पर्धेत १७ वर्षे वयोगट मुली यांनी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे झालेल्या १७ वर्षाखालील विभागीय टेनिस शालेय क्रिकेट स्पर्धेत माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा येथील मुलींचा संघ सांगली व सातारा या संघाचा पराभव करून विभागीय स्तरावर अजिंक्य ठरला असून राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा मुलींच्या संघाचा पहिला सामना सातारा संघाबरोबर झाला. सातारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सातारा संघाने निर्धारित पाच षटकात पाच बाद ४२ धावा केल्या. सातारा संघाने दिलेले हे आव्हान माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा संघाने तीन षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केले. या संघाची फलंदाज सानिया महाकाळ हिने २२ धावा आणि मनाली निंबरे हिने १० धावा केल्या.
या संघाचा दुसरा सामना सांगली संघाबरोबर झाला. या सामन्यात सांगली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित पाच षटकात ४ बाद ४० धावा केल्या. सांगली संघाचे हे आव्हान वाटद खंडाळा संघाने २.३ षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केले.यामध्ये सानिया महाकाळ या खेळाडूने १८ धावा आणि मनाली निंबरे हिने १५ धावा केल्या. हा संघ पुढे राज्य स्तरावर होणाऱ्या १७ वर्षाखालील मुलींच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघात कर्णधार मनाली निंबरे,सानिया महाकाळ, सानिका आलिम, निधी डाफळे, दिशा डाफळे, आश्लेषा लोकरे, तेजस्विनी धनावडे, इच्छा शिंदे, पूर्वा सावंत, तन्वी सावंत, संस्कृती चौघुले, सिया चौघुले,निधी सावंत, जयश्री शितप,पूजा जाधव वअनुष्का गोताड या खेळाडूंचा समावेश होता.
या संघाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक डाॅ.राजेश जाधव सर व क्रीडा शिक्षिका पल्लवी बोरकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र विचारे,उपाध्यक्ष नाथाशेठ आडाव, सचिव समीरशेठ बोरकर, सुभाषराव विचारे, संचालक संदीप सुर्वे, दिवाकर जोशी, अनिकेत सुर्वे, सीईओ बाबुशेठ पाटील, तुषार चव्हाण, किशोर मोहित, मुख्याध्यापक शिवाजी जगताप, पर्यवेक्षक आनंदा पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व क्रिकेटप्रेमी यांनी खेळाडूंचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.