(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाईच्या कामादरम्यान तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 17 जुलै रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास घडली.
या दुर्घटनेत चंद्रकांत यशवंत तांबे (वय 40) आणि मृदुला वासुदेव वाडकर (वय 60), दोघेही रा. निवळी, यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोघे काही घरगुती कामासाठी परिसरात झाडझुडपांची सफाई करत असताना त्यांचा संपर्क तुटलेल्या विद्युत तारेशी आला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व स्थानिक पोलीस पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरा ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत अधिकृत नोंद करण्यात आली.
या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. विद्युत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.