(संगमेश्वर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या ठिकाणी संगमेश्वर बस स्थानक आहे. गेल्या काही महिन्यांपासून बस स्थानक नव्याने बांधण्याचे काम सुरू होते. सध्यस्थितीत हे काम पूर्णत्वाकडे असून येत्या दीड महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एका बाजुला बस स्थानकाचे काम सुरू तर दुसऱ्या बाजूला मुंबई गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे बस स्थानकाच्या बाहेर काही वेळेस मोठीं वाहतूक कोंडी होते. या बसस्थानकात लांब पल्ल्याच्या एस टी बसेस थांबा घेतात. तसेच गाव-खेड्यात जाणाऱ्या गाड्या संगमेश्वर बसस्थानकातून सुटत असतात. बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होण्याची चिन्हं दिसत असल्याने लवकरच एस टी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या बस स्थानकाच्या नूतन इमारतीसाठी तीन कोटी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. येथील नूतन इमारत दोन मजली असणार असून यामध्ये तळमजल्यावर कॅन्टीन, आरक्षण आणि पास कक्ष, पोलीस चौकी हिरकणी कक्ष दुसऱ्या मजल्यावर पुरुष आणि महिलांसाठी विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत. गेले अनेक वर्ष संगमेश्वर बस स्थानक नूतन इमारतीच्या प्रतीक्षेत होते. स्वच्छतागृहांसह इमारतीची दुरवस्था झाली होती. मात्र बस स्थानकाचे जुनी इमारत जमीदोस्त करून नवीन कामाला सुरुवात करण्यात आली. प्रसिद्ध ठेकेदार संदीप रहाटे हे या इमारतीचे काम करीत आहेत. त्यामुळे ही इमारत लवकर पूर्ण होईल असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.