( रत्नागिरी /प्रतिनिधी )
शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता आणि परिश्रमाचा गौरव करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार, दि. १९ जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन (सिव्हिल हॉस्पिटल शेजारी) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा व पदव्युत्तर परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार हे होते.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेल्या डॉ. संघमित्रा फुले गावडे (अधिक्षक, प्रादेशिक मनोविकार रुग्णालय, रत्नागिरी) यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वतःचे ध्येय ठरवा आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहा’ असा मोलाचा सल्ला दिला. त्यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणिवा यांची सांगड घालून यशस्वी आयुष्य घडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
गुणगौरव समारंभात प्रत्येक विद्यार्थ्याला समितीच्या वतीने प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व प्रवास भत्ता प्रदान करण्यात आला. यावेळी लोकनेते बी. व्ही. पवार वाचनालयाला प्रा. बाबासाहेब कांबळे यांनी डॉ. आंबेडकर लिखित मौल्यवान पुस्तके भेट दिली. समारंभास एल. व्ही. पवार (अध्यक्ष), दीपक जाधव (सरचिटणीस), शिवराम कदम (सहसचिव), डॉ. संघमित्रा फुले गावडे, बी. के. कांबळे (जिल्हा सचिव, भारतीय बौद्ध महासभा), राजेंद्र कांबळे (तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), सुनील पवार, शांताराम पवार, मानसी कांबळे, दीपाली जाधव, प्रा. बाबासाहेब कांबळे व पत्रकार-सामाजिक कार्यकर्ते केतन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्मारक समितीच्या वतीने अतिशय सुरळीत आणि सुसंगत आयोजन करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद, प्रेरणा आणि आत्मविश्वास संचारला असल्याची भावना पालक आणि उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.