(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने राबविलेल्या ‘मिशन शोध’ मोहिमेला यश मिळाले आहे. एकाच वेळी दोन बेपत्ता व्यक्तींचा मुंबईत शोध घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन शोध’ या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून नोंद झालेल्या हरविलेल्या आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रभावी कारवाई करत दोन जुन्या बेपत्ता प्रकरणांचा निकाल लावला. संगमेश्वर पोलीस ठाण्यातील नापत्ता रजिस्टर क्रमांक 11/2018 अंतर्गत सौ. माधुरी मंगेश तांबे (वय 33, रा. माखजन, बनेवाडी, ता. संगमेश्वर) या महिला 2018 सालापासून बेपत्ता होत्या. तसेच त्याच गावातील श्री. योगेश भालचंद्र तांबे (वय 45) हेही 2022 सालापासून बेपत्ता होते.
दोन्ही प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर ‘मिशन शोध’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सुपूर्द करण्यात आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सखोल तपास सुरु केला. दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत छापेमारी करताना दोन्ही बेपत्ता व्यक्ती नालासोपारा (पूर्व) परिसरात आढळून आले. त्यांनी आपले नाव, गाव व मोबाईल क्रमांक बदलून वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, आपल्या गावी परतण्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांना तुळींझ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत श्रेणी. पो.उ.नि. प्रशांत बोरकर आणि पो. हवा/1238 प्रवीण खांबे यांनी विशेष मेहनत घेतली. ‘मिशन शोध’ अंतर्गत मिळालेल्या या यशामुळे रत्नागिरी पोलीसांचे प्रयत्न अधोरेखित झाले असून जिल्हा अधीक्षक नितीन बगाटे यांच्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्येही समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

