(संगमेश्वर / एजाज पटेल)
दारू पिण्याचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीला शिवीगाळ करत तीच्या दिशेला भिरकावलेला दगड डोक्याला लागून गंभीर दुखापत झाली आहे. डोक्याला दुखापत झालेल्या पत्नीवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द बोलेवाडी येथे आज (मंगळवारी 31 डिसेंबर रोजी) सकाळी 10.30 च्या दरम्यान घडली असून संगमेश्वर पोलीस ठाण्यात पती विरुद्ध पत्नीने तक्रार दाखल केली आहे.
आंबेड बुद्रुक येथील नंदकुमार विष्णू बोले याला दारू पिण्याचे व्यसन असून दारू पिऊन घरी आल्यावर तो त्याची पत्नी स्नेहा हिच्याशी काहीना काही कारण काढून शिवीगाळ करून वादावादी निर्माण करून तीला मारहाण करत असे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून स्नेहा बोले ही दोन मुलांना घेऊन शेजारी असलेल्या प्रतीक्षा प्रकाश पाताडे हिच्या घरी गेले आठ दिवस राहत होती.
आज (मंगळवार) सकाळ च्या सुमारास स्नेहा ही शेजारील स्नेहल अनिल पोरनाक या महिलेला सोबत घेऊन स्वतःचे कपडे घेण्यासाठी तिच्या घराकडे गेली असता नंदकुमार याने शिवीगाळ करत तीच्या दिशेने दगड भिरकावले त्यातील एक दगड स्नेहा हिच्या डोक्याला लागून ती तेथेच जमिनीवर कोसळली.
स्नेहा हिच्या डोक्याला दगड लागून गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. स्नेहा हिने तिचा पती नंदकुमार याच्या विरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केले असून या पूर्वीही तिने पती दारू पिऊन मारहाण करत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केले असल्याचे नमूद केले असून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मनवळ अधिक तपास करत आहेत.