( देवरूख )
संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी औषधी शेतीतून नवे आर्थिक क्षितिज खुलं होणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, तालुका कृषि अधिकारी कार्यालय संगमेश्वर, गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमेश्वर आणि ॲग्रोस्टार शेतकरी कंपनी देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने “अश्वगंधा लागवड प्रशिक्षण शिबिर व कृषी प्रेरणासत्र” गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती संगमेश्वर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असून, “कोकणातील सुपीक माती, सेंद्रिय परंपरा आणि शास्त्रीय मार्गदर्शन यांची सांगड घातल्यास शेतकऱ्यांचा नफा दुपटीने वाढू शकतो” या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे.
‘अश्वगंधा’ हे कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णपीक ठरणार आहे. कमी खर्च, कमी पाणी आणि जास्त नफा या तत्त्वावर आधारित या पिकाचे हेक्टरी उत्पादन ६ ते ८ क्विंटल असून सध्याचा बाजारभाव ₹२५० ते ₹४५० प्रति किलो आहे. केवळ पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१.७५ लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. विशेष म्हणजे या पिकाची थेट कंपनी खरेदीची हमीही देण्यात आली आहे.
“जिवा ऑर्गॅनिक कंपनी (कॅनडा)” आणि “ॲग्रोस्टार शेतकरी कंपनी, देवरुख-संगमेश्वर” यांच्या सहकार्याने या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा माल त्या दिवशीच्या बाजारभावाने खरेदी करण्यात येईल. बियाणे, प्रमाणपत्र आणि प्रशिक्षणाचा सर्व खर्च कंपनीकडून मोफत पुरवला जाणार आहे. कोणतेही छुपे शुल्क नसून, केवळ सेंद्रिय पद्धतीने लागवड केली जाणार आहे. सर्व व्यवहार १०० टक्के पारदर्शक असतील.
या प्रकल्पाला शासकीय अनुदानाची जोड मिळणार आहे. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, संगमेश्वर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ₹६०,००० प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त ₹१,२०,००० प्रति शेतकरी इतके अनुदान मिळवून देण्यासाठी प्रशासन मदत करणार आहे. नोंदणीसाठी ओंकार बेलोसे (९८२३४५६७८१), निखिल कोळवणकर (९४२०९०७३८८), रोहित पाटील – ॲग्रोस्टार (७७४४०५१००६) तसेच कृषि विस्तार अधिकारी प्रणय भायनाक (९८२३८३२८६३ / ९३७०५२६५७२) या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा.
प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पहिल्या १०० शेतकऱ्यांना विनामूल्य कृषि दैनंदिनी आणि विशेष सवलत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गातच सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक माहिती प्रत्यक्ष दिली जाणार असून फोनद्वारे कोणतीही माहिती दिली जाणार नाही.
या उपक्रमातून संगमेश्वर तालुक्यात औषधी शेतीकडे नवा कल निर्माण होणार असून अश्वगंधा लागवडीतून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरी “कृषी क्रांती” घडू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

