( संगमेश्वर / एजाज पटेल )
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे. सोमवार रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शास्त्री आणि सोनवी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, संगमेश्वर आठवडा बाजारसह अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुराच्या पाण्याने बाजारपेठ वेढली, दुकानदारांची धावपळ
सकाळच्या पहाटेपासूनच संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी शिरू लागले. अचानक आलेल्या पाण्यामुळे सौ. नयना दिलीप शेट्ये, करन कैलास शेट्ये, प्रदीप शिंदे आणि रविंद्र खातू यांच्यासह अनेक दुकानदारांची तारांबळ उडाली. त्यांच्या दुकानांत चार फूटांपर्यंत पाणी शिरल्याने माल वाचवण्यासाठी त्यांनी रात्रभर धडपड केली.
महामार्ग ठप्प, पूल पाण्याखाली
संगमेश्वर-बाजारपेठेतील असुर्डे पुलावर तीन ते चार फूट पाणी साचल्याने आंबेड-शास्त्रीपुल-डिंगणी मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. लोवले आणि बुरंबी परिसरात सोनवी नदीचे पाणी पुलांवर आल्यामुळे संगमेश्वर-देवरुख मार्गावरील वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली. पावसाचा जोर कमी होताच काही तासांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
नदी-खाडीतून पुराच्या रूपाने आलेले पाणी भातशेतीवर..
फुणगूस, कोंडये, डावखोल, परचुरी, डिंगणी, पिरंदवणे, करजुवे, भिरकोंड, आंबेड, लोवले, बुरंबी या गावांमधील नदी आणि खाडी किनाऱ्यावरील भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली. ऐन लावणीच्या वेळेस हुलकावणी देणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पंप, हंडा, कळशी यांच्या साहाय्याने लावलेली भातशेती आता गाळ आणि चिखलामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत सापडला आहे.
महामार्गावर दरड कोसळली; ठेकेदार कंपनी गायब
संगमेश्वरजवळील ओझरखोल ते कुरधुंडा दरम्यान अवघ्या काही किलोमीटर अंतरात तीन ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर मोठा मातीचा ढिगारा जमा झाला. सुदैवाने या दरम्यान वाहने नसल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र, दरड कोसळल्यानंतरही बराच वेळ ठेकेदार कंपनीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
जनजीवन विस्कळीत, आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी
या अविश्रांत पावसामुळे संगमेश्वर तालुक्यात जलमय स्थिती निर्माण झाली असून, प्रशासनासमोर आपत्ती व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी उभी आहे. नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

