( संगमेश्वर /प्रतिनिधी )
तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायतीचे सरपंच सहदेव सुवरे यांना नुकतेच पुणे येथे आयोजित स्वराज्य रक्षक वृत्तसेवा समुहाच्या वतीने “राज्यस्तरीय आदर्श सरपंच” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुवरे यांनी सरपंच पदावर विराजमान झाल्यापासून अनेक विकासात्मक कामे हाती घेतली. विविध कामांचा शासन-प्रशासनापर्यंत पाठपुरावा करून कामे तडीस नेण्यासाठी प्रयत्न केला आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन गावचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाव लौकिक मिळवल्याने सुवरे यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात जो एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ठसा उमटविला आहे. त्यांच्या प्रशंसनीय व सन्मानयोग्य कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.