(संगमेश्वर)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डिंगणी घाट परिसरात २ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्वलनशील गॅस (LPG) वाहतूक करणाऱ्या जडवाहनाच्या निष्काळजी वाहन चालवल्यामुळे अपघात झाल्याची गंभीर घटना घडली. मुंबई येथील रहिवासी नरेश लक्ष्मण वरेकर यांच्या वाहनास LPG टँकर क्रमांक MH 08 AP 3961 ने धडक दिली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली; मात्र घटनेनंतर समोर आलेल्या बाबींमुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अपघातानंतर करण्यात आलेल्या तपासणीत संबंधित LPG टँकरबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. ज्वलनशील गॅस वाहतूक करणारे वाहन असूनही त्यावर आवश्यक Hazard अथवा Flammable Gas चेतावणी चिन्हे लावण्यात आलेली नव्हती. तसेच या वाहनास कोणताही सहाय्यक अथवा क्लिनर नसल्याचे निदर्शनास आले. शासनाच्या mParivahan प्रणालीवर तपासणी केली असता वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र जुलै २०२५ पासूनच समाप्त झाल्याची माहिती समोर आली. असे असतानाही हे वाहन सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपघातानंतर संबंधित चालकाकडे आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे आढळून आले. अपात्र व असुरक्षित वाहनातून ज्वलनशील गॅसची वाहतूक करणे हे अत्यंत धोकादायक असून, कोणत्याही क्षणी मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते, अशी गंभीर भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार तसेच FIR नोंदविण्यात आली असून परिवहन विभाग, पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटना (PESO) तसेच इतर संबंधित प्राधिकरणांकडेही तक्रार सादर करण्यात आली आहे.
हा प्रकार केवळ वैयक्तिक अपघातापुरता मर्यादित नसून जनहिताचा आणि सार्वजनिक सुरक्षेशी थेट संबंधित असल्याचे वरेकर यांनी स्पष्ट केले आहे. ज्वलनशील गॅस वाहतूक करणारी फिटनेस नसलेली व बेकायदेशीर वाहने रस्त्यावर धावत असतील, तर भविष्यात मोठी जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा धोकादायक घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

