(दापोली)
छत्रपती शिवाजी महाराजांचा गाण्यात एकेरी उल्लेख करुन टिंगलटवाळी केल्याचा आक्षेप घेत काही जणांना धक्काबुक्की करुन तोंडाला काळे फासण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे घडली.
रविवारी आंजर्ले येथील काहीजण दीपस्तंभानजीक गेले होते. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख असलेले टिंगलटवाळीचे गाणे म्हटले. ते समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्यामुळे दोन दिवस त्यावर मोठी चर्चा झाली आणि मंगळवारी गावात स्थानिक तरुणांनी बैठक घेतली. या बैठकीत संबंधित तरुणांनी माफी मागितली. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तेथेच येऊन माफी मागण्याचे ठरले. त्यानुसार बुधवारी सकाळी हे सर्वजण तेथे पोहोचले. मात्र अनेक संतप्त शिवप्रेमी तेथे उपस्थित होते. जे झाले त्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत संतप्त जमावाने त्यांच्या तोंडाला काळे फासले.
अहवेलना करणाऱ्यांनी अखेर छत्रपती शिवरायांची माफी मागितल्यानंतर विषय थांबला. यावेळी दापोली पोलिस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जमावाने शेकडो लोकांच्या साहाय्याने एक निवेदनही दापोली पोलिसांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांकडूनही लेखी माफीनामा घेण्यात आला आणि तो पोलिसांकडे देण्यात आला. ही घटना समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.