(दापोली)
विश्वास शरद भोपे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. दापोली तालुक्यातील जि.प. शाळा शिवाजीनगर-भौंजाळी येथील मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या भोपे यांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि गुणवत्तापूर्ण सेवेला मान्यता देत, तालुका पंचायत समिती कला, क्रीडा मंडळ, दापोली यांच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थीप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि नवोपक्रमशील शिक्षक म्हणून भोपे यांची ओळख आहे. त्यांनी सडवे व शिवाजीनगर (भौंजाळी) येथील शाळांमध्ये कार्य करताना केवळ ज्ञानदानच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावली असून, शाळेला नावलौकिक प्राप्त झाला आहे.
पेन्शन संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कार्य करताना त्यांनी शिक्षक बांधवांसाठीही मोलाचे योगदान दिले. शाळा व्यवस्थापन समिती, सहकारी शिक्षक तसेच गटशिक्षणाधिकारी,श्री.रामचंद्र सांगडे, विस्तार अधिकारी,बळीराम राठोड व केंद्रप्रमुख सुनिल कारखेले आदिंच्या सहकार्यानेच हा यशस्वी प्रवास शक्य झाल्याची कृतज्ञ भावना भोपे यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि समाजात प्रेरणेची नवी ज्योत पेटली असून, “निष्ठा, परिश्रम आणि समर्पण असेल तर यश नक्की मिळते” हा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला आहे. भोपे यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

