(दापोली)
तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे मुलानेच आपल्या आई-वडिलांवर हल्ला केल्याची घटना आज, बुधवार (२३ सप्टेंबर) रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुनील आग्रे (वय ४०) याने वडील मधुकर आग्रे यांच्या डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने, तर आई अनिता आग्रे यांच्या डोक्यावर काचेच्या बाटलीच्या सहाय्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
उपलब्ध माहितीनुसार, हा प्रकार मधुकर आग्रे यांच्या राहत्या घरीच घडला. दुपारच्या वेळी घडलेल्या या घटनेत मधुकर आग्रे आणि अनिता आग्रे यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. हल्ल्याच्या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर जखमी मधुकर आग्रे आणि अनिता आग्रे यांना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचे समजते.
भरदिवसा आपल्या राहत्या घरातच आई-वडिलांवर हल्ला झाल्याची माहिती परिसरात पसरताच जालगाव गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, हल्ल्याच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला की अन्य कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला, याबाबत सध्या निश्चित माहिती उपलब्ध नाही. अधिकृत पंचनामा पूर्ण झाल्यानंतर तसेच पोलिसांच्या तपासातून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी सुनील आग्रे याला ताब्यात घेतले असून दापोली पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. घटनेचा पंचनामा आणि अन्य आवश्यक तपासाची प्रक्रिया सुरू आहे. या तपासानंतर हल्ल्याचे नेमके कारण तसेच घटनेशी संबंधित अन्य बाबी स्पष्ट होणार आहेत.


