(दापोली / रत्नागिरी)
भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा दापोली यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचनमाला २०२६ अंतर्गत वणंद येथील ग्रामशाखेत प्रबोधनात्मक प्रवचन कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय बौद्ध महासभेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेचे सरचिटणीस एन. बी. कदम गुरुजी यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान’ या विषयावर मार्गदर्शन करताना संविधाननिर्मितीची पार्श्वभूमी, त्यातील मूलभूत तत्त्वे आणि संविधानाचे सामाजिक जीवनातील महत्त्व सोप्या भाषेत विशद केले.
११ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणंद ग्रामशाखेचे अध्यक्ष दीपक धोत्रे होते. आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन आणि कदम गुरुजी यांच्या धम्मवाणीतून सूत्रपठण झाल्यानंतर स्थानिक शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधाननिर्मितीच्या प्रक्रियेत बजावलेली भूमिका, संविधानातील तरतुदींमागील विचार आणि लोकशाही व्यवस्थेत संविधानाचे असलेले स्थान याविषयी कदम गुरुजी यांनी संदर्भांसह विवेचन केले. संविधानातील मूल्ये समजून घेणे, त्यांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करणे आणि सामाजिक समतेची जाणीव अधिक दृढ करणे, या दृष्टीने त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व प्राप्त झाले.
या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे दापोली तालुका अध्यक्ष अनिल घाडगे , जिल्हा संघटक सुनील धोत्रे, संस्कार विभाग सचिव आनंद शेळके, तालुका संघटक तानाजी जाधव व बाबुराव जाधव, शहर शाखाध्यक्ष गमरे, सचिव दिलीप मोहिते, शिरसाट, वसंत शिर्के, टाळसुरे शाखेचे मंगेश जाधव, पिसई प्राथमिक आरोग्य केंद्राचे संतोष जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे दापोली सचिव प्रथमेश जाधव यांच्यासह उपासक-उपासिका उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष अनिल घाडगे, स्थानिक शाखेचे संतोष धोत्रे आणि गमरे यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. स्थानिक शाखेचे कोषाध्यक्ष पवन धोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्षीय मनोगतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.


