( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
खेडशी -चांदसूर्या परिसरातील महामार्गावर जखमी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने स्थानिक धाडसी ग्रामस्थांच्या मोलाच्या मदतीने सुरक्षितपणे जेरबंद केले. प्राथमिक उपचारानंतर या बिबट्याला पुढील अत्याधुनिक उपचारांसाठी पुणे येथील वन्यजीव बचाव केंद्रात (रेस्क्यू सेंटर) रवाना करण्यात आले आहे. अंधार आणि जखमी श्वापदाच्या आक्रमकतेची पर्वा न करता वनकर्मचारी आणि खेडशी-हातखंबा येथील नागरिकांनी दाखवलेल्या समन्वय व धाडसामुळे एका वन्यजीवाला वेळेत जीवदान मिळाले आहे.
चांदसूर्या येथील मलुष्ठे यांच्या आंबाबागेसमोरील रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक बिबट्या जखमी अवस्थेत असल्याची माहिती हातखंबा येथील निरंजन जठार यांनी फोनद्वारे वनविभागाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे पथक तातडीने बचाव साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्या लंगडत आणि अडखळत पुढे सरकत होता. जखमी अवस्थेमुळे तो आक्रमक होऊन हल्ला करण्याचा धोका असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्याला बेशुद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. देवरुख येथून मागविण्यात आलेल्या ‘डार्ट गन’च्या साहाय्याने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूप काळे यांनी बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले. रात्रीच्या गडद अंधारात आणि बागेतील झुडपांमध्ये बिबट्याचा माग काढणे अत्यंत जोखमीचे होते. मात्र, या कठीण प्रसंगी खेडशी आणि हातखंबा येथील धाडसी नागरिकांनी मागे न हटता वनविभागाच्या पथकाला खांद्याला खांदा लावून मोलाची साथ दिली. ग्रामस्थांनी दाखवलेले हे धाडस आणि वनविभागाच्या अचूक नियोजनामुळे ही मोहीम यशस्वीपणे फत्ते झाली.
बिबट्याला पिंजऱ्यात घेतल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूप काळे यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली. या बिबट्याच्या जखमांचे स्वरूप पाहता त्याला अधिक सखोल आणि विशेष उपचारांची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वनविभागाने तातडीने पावले उचलत या बिबट्याला पुढील उपचारांसाठी पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्याला रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळावरील थरारक संपूर्ण मोहीम विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, पशुवैद्यकीय अधिकारी स्वरूप काळे, देवरुखचे वनपाल सागर गोसावी, पालीचे वनपाल रत्नराज गायकवाड, वनरक्षक सहयोग कराडे (साखरपा), आकाश कडूकर (फुणगुस), शर्वरी कदम (जाकादेवी), विराज संसारे (रत्नागिरी) तसेच जलद कृती दलाचे (RRT) महेश धोत्रे आणि ईशान खानोलकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
वनविभागाचे आवाहन
परिसरात कोठेही जखमी किंवा संकटात सापडलेला वन्यप्राणी आढळून आल्यास नागरिकांनी स्वतः कोणताही धोका न पत्करता तात्काळ वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी वनविभागाकडून करण्यात आले आहे.


