( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा जवळील भोके फाटा येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात भोके गावातील ज्येष्ठ, लोकप्रिय आणि सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर (वय ७२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील अंतर्गत रस्त्यावरून महामार्गावर येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एफझेड मोटरसायकलने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कनगुटकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुनाथ कनगुटकर हे शनिवारी सायंकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास भोके येथील आंबेकरवाडीमधून आपल्या दुचाकीने खेडशी येथील निवासस्थानी जाण्यासाठी निघाले होते. भोके फाट्यावरून ते मुंबई-गोवा महामार्गावर प्रवेश करत असतानाच हातखंबा बाजूकडून निवळीच्या दिशेने भरधाव वेगाने धावणाऱ्या एफझेड मोटरसायकलने त्यांच्या दुचाकीला समोरून जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दोन्ही दुचाकी रस्त्यावर दूरवर फेकल्या गेल्या. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच गुरुनाथ कनगुटकर यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या एफझेड चालकाला पुढील उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लक्ष्मण कोकरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघाताचे नेमके कारण, वाहनांचा वेग आणि इतर बाबींचा ग्रामीण पोलीस सखोल तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे महामार्गावरील वाढत्या वेगाच्या वाहनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भोके फाटा परिसरात सुरक्षित वाहतुकीसाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांच्या मनात घर करणारे आदर्श शिक्षक हरपले
गुरुनाथ कनगुटकर यांनी भोके गावातील शाळेत अनेक वर्षे शिक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली होती. शिस्त, प्रामाणिकपणा, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि मनमिळावू स्वभाव यामुळे ते गावासह संपूर्ण परिसरात अत्यंत आदराचे स्थान मिळवून होते. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय, प्रशासकीय आणि खासगी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या अकाली आणि अपघाती निधनाची बातमी समजताच भोके, खेडशी आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

