(ठाणे)
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ, लेखक, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज (शुक्रवारी) सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मानसिक आरोग्य क्षेत्र, साहित्यविश्व, सामाजिक संस्था आणि ठाणे शहरावर शोककळा पसरली आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी हे ठाण्यातील समतानगर परिसरात वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मानसिक आरोग्याबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या डॉ. नाडकर्णी यांनी १९८० साली एमबीबीएस आणि १९८४ मध्ये मनोविकारशास्त्रात एमडी पदवी संपादन केली. मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना मानसिक आधार, समुपदेशन आणि उपचार उपलब्ध करून दिले.
डॉ. नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्य हा केवळ वैद्यकीय विषय न ठेवता तो सामाजिक आणि मानवी भावनांशी जोडला. साहित्य, संगीत, नाटक आणि संवाद यांचा वापर करून त्यांनी समाजप्रबोधनाची वेगळी वाट निर्माण केली. लेखक आणि व्याख्याते म्हणूनही त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या लेखनालाही मोठी दाद मिळाली. गद्धेपंचविशी आणि विषादयोग या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच रंग माझा वेगळा आणि असेच आम्ही सारे या नाटकांमधून त्यांनी मानसिक आणि सामाजिक विषय प्रभावीपणे मांडले.
ते मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या संस्थेचे संस्थापक सदस्यही होते. मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि समुपदेशन क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.

