(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरात सुरू असलेल्या मिऱ्या-नागपूर महामार्ग कामादरम्यान उभारण्यात आलेले तात्पुरते वाहतूक सर्कल आता वाहनचालकांसाठी गंभीर धोक्याचे कारण ठरत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. अत्यंत वर्दळीच्या या चौकात तीनही बाजूंनी सतत वाहने ये-जा करत असताना अरुंद आकाराचे तात्पुरते सर्कल उभारल्याने वाहतुकीत गोंधळ, चुकामूक आणि अपघाताची शक्यता वाढली आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामादरम्यान सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी पर्यायी मार्ग आखताना आवश्यक रुंदी, वळणाचा कोन, मोठ्या वाहनांची हालचाल आणि दृश्यमानता यांचा काटेकोर विचार होणे अपेक्षित असते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, तयार केलेली तात्पुरती वाहतूक व्यवस्था प्रत्यक्ष परिस्थितीचा पुरेसा विचार न करता उभारण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या मालवाहू वाहनांना वळण घेताना अडथळे निर्माण होत असून, त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. लहान वाहनांना जागा मिळत नसल्याने क्षणाक्षणाला धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेस ही धोकादायक स्थिती कशी पडत नाही, असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे. धोक्याची स्पष्ट चिन्हे असूनही सुधारात्मक उपाययोजना न केल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.
हातखंबा ते साळवी स्टॉपदरम्यान सध्या वळविण्यात आलेल्या मार्गावर यापूर्वीही किरकोळ तसेच गंभीर अपघातांच्या घटना घडल्या आहेत. काम सुरू असताना सुरक्षित पर्यायी मार्ग उभारणे ही मूलभूत जबाबदारी ठेकेदार कंपनीची असताना प्रत्यक्षात अपुरे नियोजन वारंवार दिसून येत आहे. परिणामी, नाहक त्रास, विलंब आणि जीविताचा धोका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. महामार्ग उभारणी ही विकासासाठी आवश्यक असली तरी त्याच वेळी सुरक्षिततेचे भान आणि वाहतुकीचे शास्त्रीय नियोजन अपरिहार्य आहे. अन्यथा विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार, अशी भीती देखील आता व्यक्त होत आहे.

