(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
भरधाव वाहनांची वर्दळ असलेल्या मिऱ्या – नागपूर महामार्गावरील चांदसूर्या येथील महामार्गावर शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) रात्री एका बलदंड बिबट्याने ऐटीत ठाण मांडल्याने वाहनचालक आणि नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली. वाहनांचे प्रखर दिवे आणि बघ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे बिथरलेल्या या जखमी बिबट्याने डरकाळ्या फोडत तब्बल साडेतीन तास परिसरात दहशत निर्माण केली होती. अखेर, वनविभाग आणि पोलिसांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धाडसी मोहीम राबवत, बेशुद्धीचे दोन डोस देऊन या वनराजाला सुरक्षितपणे जेरबंद केले. या मोहिमेदरम्यान बिबट्याच्या दर्शनासाठी जीव धोक्यात घालून महामार्गावर गर्दी करणाऱ्या अतिउत्साही बघ्यांना पोलिसांचा चांगलाच इंगा पाहावा लागला.
शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास चांदसूर्या येथील गाड्यांच्या वर्दळीच्या महामार्गावर हा बलदंड बिबट्या नागरिकांना दिसून आला. वाहनांची सततची ये-जा आणि समोरून येणाऱ्या प्रकाशाच्या झोतामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्याने थेट महामार्गाच्या रस्त्यावरून जुन्या (बायपास) रस्त्यावर झेप घेत डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली. एका बाजूला मलुष्ठे यांच्या बागेची उंच संरक्षक भिंत, तर दुसऱ्या बाजूला महामार्गाचा भराव अशा कोंडीत हा बिबट्या सापडला होता. त्यातच गंभीर जखमी असल्याने तो कमालीचा आक्रमक झाला होता. सुरुवातीला एखाद्या अज्ञात वाहनाची धडक बसून तो जखमी झाला असावा, असा कयास बांधला जात होता.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचारी शर्वरी कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पालवे, हातखंबा बीट अंमलदार भिसे, खेडशी बीट अंमलदार बाजी कदम, कोकरे आणि हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे उपनिरीक्षक बळवंत पाटील हे आपल्या पथकासह (वाहतूक पोलीस कोळी, दाभाडे, वाक्री, नटे) दाखल झाले. दुसरीकडे, जीवाची पर्वा न करता महामार्गाच्या कडेला वाहने उभी करून बिबट्याची ‘झलक’ पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या अनावश्यक गर्दीमुळे बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती होती. अखेर, बीट अंमलदार बाजी कदम आणि उपनिरीक्षक बळवंत पाटील यांनी बघ्यांना खरमरीत शब्दांत सुनावत गर्दी पांगवली; मात्र तरीही काहींची बिबट्याला पाहण्याची हौस काही केल्या फिटत नव्हती. याच गोंधळात बिबट्याने चपळाईने तब्बल दहा फूट उंचीची संरक्षक भिंत ओलांडून मलुष्ठे यांच्या बागेत धूम ठोकली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी (तथा वृक्ष अधिकारी) विक्रम गुरव पिंजरा आणि बचाव पथकासह काही मिनिटांत दाखल झाले. बागेत हा बिबट्या निपचित पडून असल्याचे दिसले. मात्र, जखमी अवस्थेत असल्याने त्याला जाळ्याने पकडणे जीवावर बेतणारे ठरले असते. त्यामुळे त्याला बेशुद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि देवरुख येथील वनविभागाच्या पथकाला ‘ट्रँक्विलायझर गन’सह पाचारण करण्यात आले. सव्वा अकराच्या सुमारास देवरुखचे पथक दाखल झाल्यानंतर खेडशी व हातखंबा येथील ग्रामस्थांच्या मदतीने बागेत शोधमोहीम सुरू झाली. अर्ध्या तासाच्या शोधानंतर बागेच्या दुसऱ्या टोकाला असलेला दगडी बांध ओलांडून जंगलात पसार होण्याच्या तयारीत असलेला बिबट्या कर्मचाऱ्यांना दिसला. चाहूल लागताच चिडलेल्या बिबट्याने मागे वळून कर्मचाऱ्यांच्या दिशेने धाव घेत जोरदार डरकाळी फोडली. या अनपेक्षित पवित्र्याने एकच पळापळ झाली; यात एक नागरिक दगडावर अडखळून पडला. क्षणाचाही विलंब न लावता वनविभागाच्या पथकाने बिबट्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन झाडले. पहिल्या डोसनंतर तो खाली बसला, पण पूर्णपणे बेशुद्ध न झाल्याने खबरदारी म्हणून दुसरे इंजेक्शन झाडले. त्यानंतर अखेर दोन्ही इंजेक्शनचा परिणाम झाल्यानंतर बिबट्याने डोके जमिनीवर टेकवले.
दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी स्वरूप काळे यांनी बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री केल्यानंतर त्याला स्थानिकांसह वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने पिंजऱ्यात हलवण्यात आले. प्राथमिक पाहणीत त्याच्या मानेवर खोल जखमा आढळल्या असून, चारही पाय आणि मागील भाग सुस्थितीत आहे. हा नर बिबट्या नऊ ते दहा वर्षांचा असून पूर्ण वाढ झालेला आहे. मानेवरील जखमांचे स्वरूप पाहता, जंगलात दुसऱ्या बिबट्याशी झालेल्या अस्तित्वाच्या लढाईत (झुंजीत) तो जखमी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम गुरव यांनी व्यक्त केला. त्यामुळे वाहन धडकेची शक्यता तूर्तास मागे पडली आहे. रात्री साडेबारा वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी गोसावी यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या जखमी बिबट्याला तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. महामार्गावरील वाहतूक, बागेतील गडद अंधार आणि बघ्यांचा उपद्रव या सर्वांवर मात करत वनविभाग व पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बचाव मोहिमेतून अधोरेखित झाली अत्याधुनिक साधनसामग्रीची गरज
चांदसूर्या महामार्गावर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले; मात्र या मोहिमेने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या साधनसामग्रीतील उणीवांकडे लक्ष वेधले आहे. जिल्हा मुख्यालयाजवळ ही घटना घडूनही बेशुद्धीची बंदूक (ट्रँक्विलायझर गन) देवरुखमधून मागवावी लागली. तसेच, रात्रीच्या गडद अंधारात बिबट्याचा शोध घेताना वनकर्मचाऱ्यांच्या हातात अत्याधुनिक ‘सर्चलाईट्स’ऐवजी सामान्य नागरिकांकडे असतात तशा साध्या बॅटऱ्या होत्या. केवळ पिंजरा आणि तुटपुंज्या साधनांच्या बळावर जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम गुरव यांनी सकारात्मक भूमिका मांडली. “या परिसरात अशा घटना यापूर्वी घडल्या नसल्याने बंदुकीची गरज भासली नव्हती; मात्र आता तालुक्यासाठी स्वतंत्र बंदूक उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वाढत्या वन्यप्राण्यांच्या वावरामुळे रत्नागिरीच्या पथकाला स्वतंत्र बंदूक, हाय-बीम सर्चलाईट्स आणि संरक्षक साधनांनी सज्ज करणे काळाची गरज बनली असून, या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


