(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणारे व्यसन आता केवळ तरुणाई किंवा लहान मुलांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ज्येष्ठ नागरिकही या डिजिटल आकर्षणाच्या आहारी जात असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका ७५ वर्षीय आजींचे प्रकरण याचे उदाहरण ठरले आहे. समाजमाध्यमांवरील रिल्स पाहण्याची त्यांना इतकी सवय लागली की, जेवण आणि पाण्याचेही भान राहत नव्हते. मोबाईलपासून दूर ठेवल्यानंतर त्यांची मानसिक अवस्था बिघडली आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर इतर रुग्णांचे मोबाईल घेऊन व्हिडिओ पाहण्याचा प्रकारही घडला.
एका मानसिक आरोग्य केंद्रात काही दिवसांपूर्वी या आजींना उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यांच्या कानात वेगवेगळे आवाज ऐकू येत असल्याचा भास होत होता. डोळ्यांमध्ये तीव्र वेदना जाणवत होत्या, तर स्वभावात चिडचिडेपणाही वाढला होता. या त्रासामागील कारणांचा शोध घेताना मोबाईलचा अतिवापर आणि रिल्स पाहण्याचे व्यसन असल्याचे उपचारादरम्यान स्पष्ट झाले. सुमारे पंधरा दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
आजींची मोबाईल पाहण्याची सवय इतकी वाढली होती की, स्क्रीनसमोर बसल्यानंतर त्यांना वेळेचे भान राहत नव्हते. तासन्तास व्हिडिओ पाहण्यातच त्यांचा वेळ जात असे. जेवणाची वेळ झाली किंवा तहान लागली तरी त्यांचे लक्ष मोबाईलवरून हटत नव्हते. त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतल्यावर अस्वस्थता आणि मानसिक त्रास वाढला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्वतःचा मोबाईल नसल्याने त्यांनी अन्य रुग्णांचे मोबाईल घेऊन त्यावर व्हिडिओ पाहिल्याचा प्रकारही समोर आला.
वाढत्या वयात मोबाईलच्या व्यसनामागे एकटेपणाची समस्याही कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. घरातील तरुण मंडळी नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात व्यस्त असल्याने ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा पुरेसा सहवास मिळत नाही. मुलगा आणि सून कामावर गेल्यानंतर नातवंडे शाळा किंवा अभ्यासात व्यस्त असतात. अशा वेळी घरात संवादासाठी कोणी नसल्याने मोबाईल आणि टीव्ही यांचाच आधार घेतला जातो. सुरुवातीला केवळ विरंगुळा म्हणून सुरू झालेली रील्स पाहण्याची सवय कधी व्यसनात बदलते, हे अनेकांच्या लक्षात येत नाही.
विशेषतः ग्रामीण भागातून मुलांसोबत राहण्यासाठी शहरात आलेल्या वृद्धांमध्ये ही समस्या अधिक जाणवत आहे. गावात असताना नातेवाईक, शेजारी आणि गावातील इतर लोकांशी नियमित गाठीभेटी व संवाद होत असल्याने त्यांचा वेळ चांगला जातो. शहरात आल्यानंतर मात्र हा सामाजिक संपर्क कमी होतो. त्यामुळे निर्माण झालेला रिकामा वेळ मोबाईलवर घालवण्याकडे त्यांचा कल वाढतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोबाईलच्या व्यसनाची ही एकमेव घटना नसून अशा स्वरूपाची अनेक प्रकरणे समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.
मोबाईलचा अतिवापर मानसिक आरोग्यासोबतच शरीरावरही परिणाम करणारा ठरू शकतो. सतत स्क्रीनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. मान खाली घालून बराच वेळ मोबाईल वापरल्याने मानदुखी आणि खांदेदुखीच्या समस्या उद्भवतात. शारीरिक हालचाल आणि व्यायाम कमी झाल्याने हाडांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. याशिवाय एकाच जागी दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे हाताला झटका बसणे किंवा पाय लचकणे अशा समस्याही वाढत आहेत. मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे जेवण, चहा आणि इतर दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष होते. मोबाईल दूर केल्यावर चिडचिड वाढणे हेदेखील या व्यसनाचे एक लक्षण ठरू शकते. त्यामुळे ज्येष्ठांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी मत व्यक्त केले आहे.
मोबाईल आणि टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक इतके रमून जातात की, घरी पाहुणे आले किंवा नातेवाईक भेटायला आले तरी त्यांच्याशी बोलण्यात त्यांना रस वाटत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ मोबाईल वापरण्यास मनाई करून चालणार नाही, तर त्यामागील एकटेपणाची समस्याही समजून घेणे गरजेचे आहे. कुटुंबीयांनी ज्येष्ठ नागरिकांशी नियमित संवाद साधावा, त्यांना पुरेसा वेळ द्यावा आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची माहिती करून द्यावी.
समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल वापराच्या मर्यादेची जाणीव करून देता येऊ शकते. डोळे, हाडे आणि शरीरावर होणारे परिणाम तसेच मोबाईल न मिळाल्यास वाढणारी चिडचिड याबाबत त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यातून ते स्वतःहून मोबाईलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, यासाठी कुटुंबीयांचा सहवास, नियमित संवाद आणि घरातील सकारात्मक वातावरण तितकेच महत्त्वाचे असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.


