(मुंबई)
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दर्शवला. उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेत त्यांनी समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन केले. “धनगर समाजाने गाव सोडून मोठ्या प्रमाणावर मुंबईत एकत्र यायला हवे. जोपर्यंत ताकद दाखवली जात नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही,” असे स्पष्ट मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
आंदोलनासाठी एकजूट आवश्यक
जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर समाजातील सर्व नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. “धनगर समाजातील नेत्यांना एकत्र आणण्याची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः राज्यभरातील नेत्यांशी संपर्क साधून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन,” असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी आंदोलन शांततेत आणि शिस्तीत करण्यावर भर दिला. “आंदोलन हिंसक झाल्यास त्याचा फटका संपूर्ण चळवळीला बसतो. त्यामुळे संयम आणि शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे,” असेही ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “जर धनगर समाज मोठ्या संख्येने मुंबईत एकत्र आला, तर सहा कोटी मराठा समाज त्यांच्या पाठिशी उभा राहील. ती ताकद मी उभी करेन.”
मुख्यमंत्री फडणवीसांवर भाष्य
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटले, “फडणवीस हे डेंजर माणूस आहेत. मात्र सध्या आमचं आणि त्यांचं चांगलं चाललं आहे. मराठा समाज एकत्र आल्यामुळे त्यांनी आरक्षणाचा जीआर काढला. पण भविष्यात धोका दिल्यास आम्ही शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणावर बोलताना जरांगे पाटील यांनी अशोक खरात याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. “अशा प्रवृत्ती समाजासाठी घातक आहेत. माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. तरीही आमचे फोटो एकत्र दाखवले जात आहेत. त्याला कडक शिक्षा व्हायलाच हवी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आझाद मैदानावर मागील 9 दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय स्तरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

