(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
WhatsApp ने Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी सामान्य ग्रुपमधील सदस्यांची कमाल मर्यादा १,०२४ वरून वाढवून १,५०० केली आहे. त्यामुळे आता एका ग्रुपमध्ये पूर्वीपेक्षा ४७६ अधिक सदस्यांना सहभागी करून घेता येणार आहे. या निर्णयामुळे मोठी कुटुंबे, शाळा, कार्यालये, सोसायट्या आणि विविध कम्युनिटी ग्रुपचे व्यवस्थापन करणे अधिक सोयीचे होणार आहे.
या नव्या सुविधेमुळे सदस्यसंख्या पूर्ण झाल्यानंतर त्याच समुदायासाठी स्वतंत्र ग्रुप तयार करण्याची अॅडमिनची गरज कमी होणार आहे. यापूर्वी एका सामान्य WhatsApp ग्रुपमध्ये जास्तीत जास्त १,०२४ सदस्य जोडता येत होते. आता ही मर्यादा १,५०० झाल्याने एकाच ग्रुपच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत महत्त्वाच्या सूचना, संदेश आणि अपडेट पोहोचवणे शक्य होईल.
WABetaInfo च्या अहवालानुसार, Android आणि iOS वरील WhatsApp च्या नव्या व्हर्जनद्वारे ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सामान्य ग्रुप चॅटबरोबरच WhatsApp Communities अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ग्रुपनाही वाढीव सदस्य मर्यादेचा लाभ मिळणार आहे. मात्र, Community Announcement ग्रुपमध्ये हा बदल लागू होणार नाही. कारण या ग्रुपमध्ये यापूर्वीपासूनच २,००० सदस्य जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
WhatsApp ने यापूर्वी २०२२ मध्ये ग्रुप सदस्यांची मर्यादा ५१२ वरून १,०२४ केली होती. त्यानंतर आता प्रथमच सदस्यसंख्येत वाढ करण्यात आली आहे. मोठ्या ग्रुपमध्ये सदस्यसंख्या मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर अॅडमिनना स्वतंत्र ग्रुप तयार करून मेसेज शेअर करावे लागत होते. एकाच समुदायासाठी अनेक ग्रुप सांभाळताना सर्व सदस्यांपर्यंत समान माहिती पोहोचवणेही आव्हानात्मक ठरत होते. नव्या मर्यादेमुळे ही अडचण काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल.
दरम्यान, मोठ्या ग्रुपचे व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठी WhatsApp ने काही उपयुक्त सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये महत्त्वाचे संदेश ठरावीक कालमर्यादेशिवाय ग्रुपमध्ये सर्वात वर पिन करून ठेवण्याची सुविधा समाविष्ट आहे. तसेच ग्रुपमध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्याला पूर्वीच्या चॅटचा इतिहास पाठवण्याची सुविधाही देण्यात आली आहे. ही चॅट हिस्ट्री एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहते.
याशिवाय, संपूर्ण कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींऐवजी निवडक ग्रुपसोबत स्टेटस शेअर करता येणार आहे. असा स्टेटस २४ तासांनंतर आपोआप गायब होतो. ग्रुपमधील संदेशांमध्ये आपल्याला टॅग करण्यात आले आहे किंवा आपल्या संदेशाला थेट उत्तर देण्यात आले आहे, असे न वाचलेले संदेश शोधण्यासाठी स्वतंत्र चॅट फिल्टरची सुविधाही देण्यात आली आहे.
नवीन १,५०० सदस्यांची मर्यादा वापरण्यासाठी ग्रुप अॅडमिनना स्वतंत्र सेटिंग बदलण्याची किंवा कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. संबंधित अपडेट अकाउंटवर विद्यमान ग्रुपमध्येही वाढीव सदस्य मर्यादा आपोआप लागू होईल. त्यानंतर अॅडमिनना १,५०० सदस्यांपर्यंत लोकांना जोडता येणार आहे.
मात्र, ही सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असल्याने सर्व वापरकर्त्यांना एकाच वेळी उपलब्ध होणार नाही. ज्यांच्या WhatsApp ग्रुपमध्ये अद्याप १,०२४ सदस्यांचीच मर्यादा दिसत आहे, त्यांना अपडेट येत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांनी Google Play Store किंवा Apple App Store वर जाऊन WhatsApp ची अपडेट व्हर्जन आहे का, हे तपासावे.


