(पुणे / वृत्तसंस्था)
सराफ व्यावसायिकांचे सोने-चांदीचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे कुरिअर सेवेद्वारे विविध शहरांमध्ये पोहोचविण्याचे काम करणाऱ्या कंपनीतील डिलिव्हरी बॉयने तब्बल ९० लाख ३३ हजार रुपयांचे सोने व दागिने घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मुंबईला पोहोचविण्यासाठी दिलेली १४ पार्सल घेऊन निघालेला कर्मचारी मुंबईत न पोहोचता वाटेतच गायब झाला.
या प्रकरणी जितेंद्र ऋषिकेश सिंह (रा. लक्ष्मी अपार्टमेंट, राष्ट्रभूषण चौक, घोरपडी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल सत्यपाल चौहान (वय २०, रा. मुंबई, मूळ रा. नरोरा, जि. इटाह, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.
९० लाखांचे सोने आणि दागिने असलेली १४ पार्सल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सिंह यांचा कुरिअर व्यवसाय आहे. सराफ व्यावसायिकांकडून सोने, सोन्याची बिस्किटे, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन ती संबंधित शहरांमध्ये पोहोचविण्याचे काम कंपनीकडून केले जाते.
कंपनीची पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयात डिलिव्हरी आणि इतर कामांसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पुणे कार्यालयात रजनिश शर्मा, तर मुंबई कार्यालयात विशाल चौहान काम करत होता. चौहानला दरमहा १२ हजार ३०० रुपये वेतन दिले जात होते.
४ ऑगस्ट रोजी कोल्हापूरमधील सहा सराफ, पुण्यातील पाच सराफ तसेच जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी एका सराफाची पार्सल कंपनीकडे आली होती. या १४ पार्सलमध्ये एकूण ९० लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे बिस्किटे आणि दागिने होते.
ही सर्व पार्सल घेऊन विशाल चौहान याला ५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता रजनिश शर्मा याने स्वारगेट एसटी बसस्थानकावर सोडले. चौहान मंत्रालयाच्या बसने मुंबईच्या दिशेने रवाना झाला. बस सकाळी सुमारे ९ वाजता मुंबईत पोहोचली. मात्र, विशाल चौहान मुंबईत पोहोचलाच नसल्याचे समोर आले. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल फोन बंद असल्याचे आढळले. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बसच्या कंडक्टरशी संपर्क साधून चौकशी केली. त्यावेळी चौहान वाकड पुलाखाली बसमधून उतरल्याची माहिती कंडक्टरने दिली.
विशाल चौहानचा शोध घेऊनही त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर कंपनीचे प्रतिनिधी जितेंद्र सिंह यांनी खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी चौहानविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
९० लाखांहून अधिक किमतीचे सोने आणि दागिने नेमके कुठे गेले, तसेच विशाल चौहान याचा या प्रकरणामागील नेमका हेतू काय होता, याचा पोलीस तपास सुरू आहे.

