(शिर्डी / वृत्तसंस्था)
‘हीरो’, ‘दामिनी’, ‘घायल’, ‘शहंशाह’, ‘मेरी जंग’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून 1980 आणि 1990च्या दशकात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अभिनयक्षेत्रापासून दीर्घकाळ दूर राहिल्यानंतर त्या लवकरच रुपेरी पडद्यावर आणि ओटीटीच्या माध्यमातून कमबॅक करणार असल्याची माहिती स्वतः मीनाक्षी शेषाद्री यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, आपल्या आगामी प्रवासाची सुरुवात त्यांनी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाने केली. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कमबॅकबाबत भावना व्यक्त करताना “तब्बल 40 वर्षांनंतर साईबाबांनीच पुन्हा आपल्या दरबारी बोलावून घेतलं”, अशी भावना व्यक्त केली.
साईबाबांच्या दर्शनानंतर कमबॅकची घोषणा
मीनाक्षी शेषाद्री यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या आगामी कमबॅकची माहिती दिली. अभिनयक्षेत्रात पुन्हा सक्रिय होण्याचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील विशेष टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. साईबाबांच्या आशीर्वादानेच त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1986 ची आठवण आजही मनात ताजी
शिर्डी भेटीच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना मीनाक्षी शेषाद्री यांनी सांगितले की, 1986 मध्ये त्या नाशिकमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आल्या होत्या. त्यावेळी साईबाबांचे दर्शन घेण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली होती. त्यामुळे त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांकडे शिर्डीला जाण्याचा हट्ट धरला. त्यानंतर नाशिकहून रस्तेमार्गे शिर्डीत येऊन त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले होते. आता तब्बल अनेक वर्षांनंतर त्या पुन्हा शिर्डीत आल्या आहेत. 1986 मधील शिर्डी आणि आजचा भव्य, अद्ययावत मंदिर परिसर पाहून त्यांना मोठा बदल जाणवला.
‘दर्शनासाठी वेळ कमी पडला, पुन्हा बोलावतील…’
मीनाक्षी शेषाद्री यांनी सांगितले की, मंदिरात दर्शनासाठी मिळालेला वेळ त्यांना थोडा कमी पडल्यासारखा वाटला. मात्र, त्यामागेही त्यांनी एक आध्यात्मिक संकेत पाहिला. साईबाबा लवकरच पुन्हा दर्शनासाठी शिर्डीत बोलावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साईबाबांच्या दर्शनानंतरचा हा अनुभव त्यांच्या आगामी कमबॅकशी जोडला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही शिर्डी भेट विशेष ठरली आहे.
‘लहानपणापासून अध्यात्माची आवड’
आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक विचारांबद्दल बोलताना मीनाक्षी शेषाद्री यांनी सांगितले की, लहानपणापासूनच धार्मिक ज्ञान, अध्यात्म आणि भक्तिभाव याबद्दल त्यांना विशेष रुची आहे. साईबाबा हे आद्यगुरूंचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी गुरूंच्या आशीर्वादाशिवाय आणि ज्ञानाशिवाय मानवी मनाला खरी शांतता मिळणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, गुरूंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देतात.
आई आणि गुरूंची इच्छा पूर्ण करणार
आपल्या आगामी प्रकल्पाची माहिती देताना मीनाक्षी शेषाद्री यांनी सांगितले की, साईबाबांच्या आशीर्वादाने त्यांच्या नव्या ओटीटी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या मालिकेत त्या अत्यंत साधी, वास्तववादी आणि भावनिक भूमिका साकारताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी साकारावी, ही त्यांच्या आईची आणि गुरूंची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्यासाठी केवळ अभिनयातील पुनरागमन नसून आई आणि गुरूंची इच्छा पूर्ण करण्याचा भावनिक प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले.
ओटीटीच्या माध्यमातून नव्या पर्वाला सुरुवात
1980 आणि 1990च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मीनाक्षी शेषाद्री आता डिजिटल युगात नव्या भूमिकेसह परतत आहेत. त्यांच्या आगामी ओटीटी प्रकल्पाबाबत अधिक माहिती लवकरच ऑनलाइन माध्यमातून समोर येण्याची शक्यता आहे. आपल्या नव्या डिजिटल प्रवासासाठी साईबाबांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मीनाक्षी शेषाद्री यांच्या कमबॅकची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, त्या नव्या भूमिकेत नेमक्या कशा दिसणार, याची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना आहे.

