(मुंबई / वृत्तसंस्था)
पोलीस असल्याची बतावणी करून मध्य आफ्रिकेतील चाड येथील दोन महिला नागरिकांकडील ९७ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या आरोपींना आझाद मैदान पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. या कारवाईत लुटलेली संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, १०० टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात आला आहे.
धनजी स्ट्रीट ते कुलाबा असा टॅक्सीने प्रवास करणाऱ्या चाड येथील एका महिला नागरिकासोबत तिची मैत्रीण होती. त्यांच्या टॅक्सीचा आरोपींनी बाईकवरून पाठलाग केला. मेट्रो सिनेमा परिसरात टॅक्सी पोहोचताच आरोपींनी त्यांना अडवले. आपण पोलीस असल्याचे सांगत दोन्ही महिलांना धमकावले आणि त्यांच्याकडील ९७ लाख ५० हजार रुपये असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून तेथून पळ काढला.
या घटनेनंतर पीडित महिलांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाची (Detection Team) विविध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत चेंबूर, कळवा, ठाणे आणि अहिल्यानगर परिसरात शोधमोहीम राबवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अखेर ढोकेश्वर येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून लुटलेली ९७ लाख ५० हजार रुपयांची संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली. परदेशी महिला नागरिकांची एवढी मोठी रक्कम लुटल्याचा गुन्हा उघडकीस आणत अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


