(मुंबई / वृत्तसंस्था)
घाटकोपर पश्चिमेतील नारायण नगर परिसरात असलेल्या मदरसा जामिया फातिमातुझहराच्या बांधकामाची तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीस जारी केली आहे. प्रमोद महाजन गार्डनच्या मागील बाजूस गुरु गोविंद सिंग मार्गावर (गैबन शाह दर्गा रोड) हा मदरसा आहे. वॉर्ड ‘एल’च्या सहायक आयुक्त कार्यालयाने २३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या नोटीसमध्ये, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी २५ नोव्हेंबरपासून किंवा त्यानंतरच्या कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संबंधित जागेवर येऊन बांधकामाची पाहणी आणि मोजमाप करणार असल्याचे नमूद केले आहे.
या पाहणीसाठी मदरशाचे मालक, रहिवासी किंवा भाडेकरू यांना बांधकामाशी संबंधित मूळ कागदपत्रे उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामध्ये मंजूर आराखडा, भोगवटा प्रमाणपत्र तसेच बांधकाम कायदेशीर असल्याचे सिद्ध करणारी अन्य आवश्यक प्रमाणपत्रे यांचा समावेश आहे. मुंबई महापालिका कायद्याच्या कलम ६८ अंतर्गत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याला कलम ४८८ मधील अधिकार दिले आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांना मदरशाच्या आवारात प्रवेश करून तपासणी व मोजमाप करण्याचा अधिकार असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रमोद महाजन गार्डनमध्ये अल्पवयीन मुलांच्या एका गटाने एका मुलासह अल्पवयीन मुलीवर हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करून सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चा सुरू असतानाच मदरशाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र, बीएमसीच्या नोटीसमध्ये पाहणीमागील कारण नमूद करण्यात आले असून, हल्ल्याच्या घटनेचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
वॉर्ड ‘एल’च्या सहायक अभियंता (B and F) यांनी या नोटीशीची प्रत घाटकोपर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही पाठवली आहे. महापालिकेच्या नियोजित कारवाईची माहिती पोलिसांना व्हावी आणि पाहणीच्या वेळी आवश्यक पोलीस संरक्षण उपलब्ध करून देता यावे, हा त्यामागील उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही नोटीस २३ नोव्हेंबर रोजी दुपारी घाटकोपर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्याची पोचही देण्यात आली आहे.
दुसरीकडे, उद्यानात अल्पवयीन मुलांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर बीएमसीने गार्डनच्या कंत्राटदारावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. उद्यानातील निष्काळजीपणा आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेसाठी कंत्राटदाराला जबाबदार धरत महापालिकेने त्याला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.


