(पिंपरी-चिंचवड /पुणे)
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका सॉफ्टवेअर अभियंत्याने आपल्या प्रेयसीला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. कोमल राजेंद्र डहाके (वय 27) असे मृत तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर आरोपी रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून होता. त्यानंतर सकाळी त्याने स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल वर्धा येथील रहिवासी असून ती विप्रो या सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. शुभम काळबांडे हा बुलढाणा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून तो इन्फोसिसमध्ये काम करत होता. कोमल आणि शुभम यांची चार वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. कोमललाही हिंजवडीत नोकरी मिळाल्यानंतर दोघेही एकाच खासगी हॉस्टेलमध्ये (PG) वेगवेगळ्या रूमवर राहू लागले होते. दोघांची ओळख प्रेमसंबंधात बदलली होती. गेल्या सुमारे साडेतीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या विवाहालाही कुटुंबीयांची संमती असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. शुभमचे अन्य तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा कोमलला संशय होता. याच कारणावरून त्यांच्यात वाद होत असल्याची माहिती आहे. रविवारी (22 नोव्हेंबर) रात्री शुभम कोमलच्या रूमवर आला होता. रात्री दोघेही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर आपल्या ‘पेइंग गेस्ट’च्या ठिकाणी परतल्यावर त्यांच्यात जुन्याच कारणावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या वादाचे पुढे गंभीर परिणाम झाले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास शुभमने कोमलला हाताने, ठोसे आणि बुक्क्यांनी मारहाण केली. या भीषण मारहाणीत कोमल गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला.
कोमलचा फोन बंद येत असल्याने काळजीपोटी तिच्या आईने पुण्यात राहणाऱ्या भाच्याला पीजीवर (PG) चौकशीसाठी पाठवले. सोमवारी (23 नोव्हेंबर) सकाळी भाच्याने रूमचा दरवाजा ठोठावला असता आतून शुभमने दार उघडले. कोमलला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती मृतावस्थेत आढळून आली. घटनेनंतर शुभम रात्रभर कोमलच्या मृतदेहाजवळच बसून राहिला. दरम्यान सकाळी साडेसहा वाजताच शुभमने ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांकडे रुग्णवाहिकेची मदत मागितली होती. माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोमलला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी शुभमला ताब्यात घेतले आणि पुढे अटक केली.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी वर्धा येथील असून विप्रो सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती. आरोपीसोबत तिचे सुमारे साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मागील दोन ते तीन महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. रात्री झालेल्या भांडणानंतर शुभमने हाताने तसेच ठोसे-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. आरोपी इन्फोसिसमध्ये कार्यरत होता. रात्री साडेबारा वाजता दोघांमध्ये भांडण झाले, तर सुमारे तीन वाजता मारहाण झाली. सकाळी साडेसहा वाजता आरोपीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मदत मागितली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोमलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिचा मृत्यू मारहाणीमुळे झाला की त्यामागे अन्य काही वैद्यकीय कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. घटनेपूर्वी दोघांमध्ये झालेला वाद, त्यामागील कारण आणि प्रत्यक्ष घटनाक्रम यांचीही चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे हे तपासाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या दोन तरुणांच्या प्रेमसंबंधातून घडलेल्या या घटनेमुळे हिंजवडी परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबी पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहेत.


