(नागपूर / वृत्तसंस्था)
राज्यातील पडीक जमिनी शासनाच्या व्यवस्थापनाखाली घेण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. या निर्णयाचा मूळ शेतकरी किंवा स्वतः शेती करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर किंवा त्याहून अधिक जमीन खरेदी करून त्यावर फार्महाऊस उभारणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात जमीन शेतीविना पडीक ठेवणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय असल्याचे बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सलग तीन वर्षे एखादी जमीन पडीक राहिल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली येण्याची तरतूद कूळ कायद्यात आहे. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला किंवा काही लोकांकडून गैरसमज पसरवण्यात आला, असे बावनकुळे म्हणाले. शासनाच्या व्यवस्थापनाखाली जमीन येण्याचा अर्थ सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेणार, असा अजिबात होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणासह महाराष्ट्रातील अन्य भाग, मराठवाडा आणि विदर्भातील मूळ शेतकरी स्वतःच्या जमिनीवर शेती करत असतील, तर त्यांच्या जमिनींना या निर्णयामुळे कोणताही धोका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मात्र, काही मोठ्या लोकांनी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन खरेदी करून त्यावर फार्महाऊस बांधले आहेत. अशा जमिनी शेतीसाठी वापरण्याऐवजी पडीक ठेवल्या जात असल्याने त्या पुन्हा शेतीच्या उपयोगात आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून लँड बँक तयार करणाऱ्यांनी पुढील तीन ते पाच वर्षांत या जमिनी कृषी उत्पादनासाठी वापराव्यात, अशी सरकारची अपेक्षा असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. चांगला पाऊस झाल्यानंतर या जमिनी लागवडीखाली आल्यास कृषी उत्पादनात वाढ होऊ शकते. त्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रीय उत्पन्न आणि देशाच्या जीडीपीवर होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याला मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक ठेवणे परवडणारे नाही, अशी भूमिका महसूलमंत्र्यांनी मांडली.


