(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये शिकाऊ कामगार म्हणून कार्यरत असलेल्या २१ वर्षीय बंटी रामप्रकाश मीना याच्यावर हेरगिरीचा आरोप असून, त्याने परिसरातील संवेदनशील ठिकाणांचे सुमारे ९० व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती कुलाबा पोलिसांनी दिली आहे. तसेच पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींसोबत तो ‘ग्रुप कॉल’मध्ये सहभागी झाल्याचाही आरोप पोलिसांनी केला आहे. आरोपीच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी करताना पोलिसांनी सोमवारी (२३ नोव्हेंबर) न्यायालयात तपासातील ही माहिती सादर केली.
कुलाबा येथील बडवार पार्क परिसरात राहणाऱ्या बंटी मीना याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, अधिकृत गोपनीयता कायदा (ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. अटकेनंतर न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, या प्रकरणातील पुढील तपासासाठी पोलिसांनी आज पुन्हा कोठडी वाढवून देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, मीना एका इन्स्टाग्राम अकाउंटच्या आणि विशिष्ट व्हॉट्सॲप क्रमांकाच्या संपर्कात होता. हे अकाउंट आणि मोबाईल क्रमांक पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेच्या एजंटांकडून वापरले जात असावेत, असा तपास यंत्रणांना संशय आहे. संबंधित व्यक्ती जहाजांची देखभाल करणाऱ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी असल्याचे भासवत होत्या. मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये येणाऱ्या नौदलाच्या जहाजांबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी मीनाच्या माध्यमातून केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
या प्रकरणात मीनाशिवाय आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. गोदीतील संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी त्याला अन्य कोणाची मदत मिळाली होती का, याचाही तपास सुरू आहे. तसेच या कामासाठी मीनाला आर्थिक मोबदला देण्यात आला होता का आणि संपूर्ण कटामागे नेमके कोण आहे, हे स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात त्याचा मोबाईल फोन पोलिसांनी आधीच जप्त केला असल्याने आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित केला. मात्र, मोबाईल तपासण्यापुरता तपास मर्यादित नसून, आरोपीचे संशयितांशी असलेले संपर्क, त्यांच्यातील संवादाची पद्धत आणि या प्रकरणातील इतर संभाव्य सहभागींची भूमिका तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.


