(दापोली /रत्नागिरी)
घरातील बेडरूममधील लाकडी बेडच्या कप्प्यात सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना अडखळ येथील जुईकर मोहल्ल्यात उघडकीस आली आहे. या चोरीत तब्बल १ लाख ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १६ हजार रुपयांची रोकड चोरीस गेली आहे. याप्रकरणी सौ. फैरोजा अब्दुल रहिम चाकणकर (वय ५७, रा. अडखळ, जुईकर मोहल्ला, ता. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी घरातील बेडरूममधील लाकडी बेडच्या कप्प्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ठेवली होती. १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे दागिने आणि रोकड जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तीने बेडचा कप्पा उघडून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या उद्देशाने ही मौल्यवान मालमत्ता चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या ऐवजात १६ हजार रुपयांची रोख रक्कम, ३ ग्रॅम वजनाची लहान मुलांची सोन्याची चैन, ४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा कानातील जोड, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन फुलांचे जोड, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कानातले जोड, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १ ग्रॅम वजनाच्या सहा लहान मुलींच्या सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी १ ग्रॅम वजनाची तीन सोन्याची बिस्किटे तसेच ५ ग्रॅम वजनाचा अन्य एक सोन्याचा दागिना यांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत १ लाख ६६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घरातील मौल्यवान दागिने चोरीस गेल्याने फिर्यादी घाबरून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार न देता नातेवाइकांशी चर्चा केली. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.५४ वाजता दापोली पोलीस ठाण्यात विलंबाने तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील बेडच्या कप्प्यात ठेवलेले दागिनेही सुरक्षित नसल्याचे या घटनेतून समोर आले असून, घरातच झालेल्या या चोरीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.


