(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील उगवता कोंडवाडीमध्ये विलास दत्ताराम गावडे (वय ४५) यांनी घराशेजारील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार, १८ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चाफवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच विलास गावडे यांना गळफासावरून खाली उतरवून घरी आणण्यात आले. त्यानंतर रिक्षातून त्यांना देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तिवारी यांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी विलास गावडे यांना मृत घोषित केले.
विलास गावडे हे गावातील सामाजिक आणि सार्वजनिक कामांमध्ये नेहमीच उत्साहाने सहभागी होत असत. गावातील मंदिरातील कार्यक्रम, होळी-शिमग्याचा उत्सव तसेच ग्रामस्थांच्या घरातील विविध खासगी कार्यक्रमांमध्ये ते नियमितपणे आचारी म्हणून काम करायचे. याशिवाय रेशन दुकानात धान्याचा साठा आल्यानंतर मापारी म्हणूनही ते काम पाहत होते. त्यामुळे गावातील प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचे लग्न ठरले असून लग्नाचा कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा, याच्या तयारीत ते व्यस्त होते. अशा परिस्थितीत त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती चाफवलीचे पोलीस पाटील विजय चाळके यांनी दूरध्वनीद्वारे साखरपा पोलिसांना दिली. त्यानंतर साखरपा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


