(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. मनसेने उपस्थित केलेल्या विविध मागण्यांवर रुग्णालय प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत कार्यवाही सुरू केली असून, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या प्रश्नांना मार्ग मिळाल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.
रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी मनसेने प्रामुख्याने गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मेंदूविकार, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. तसेच काही गंभीर आजारांवरील उपचारांसाठी डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
रुग्णालयाशी संपर्क साधताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र संपर्क कक्षाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय लवकरच निःशुल्क हेल्पलाइन यंत्रणाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती मिळणे सुलभ होऊन उपचार प्रक्रियेत होणारा विलंब कमी होण्यास मदत होणार आहे.
रुग्णांसोबत रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांच्या तात्पुरत्या निवासाचा प्रश्नही मनसेने उपस्थित केला होता. या नातेवाईकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने आश्वासन दिले आहे.
त्याचबरोबर रुग्णांच्या वाहतुकीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्वमालकीच्या दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही होणार आहे. या रुग्णवाहिका जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (DPDC) माध्यमातून नाममात्र दरात उपलब्ध होणार आहेत.
सर्वसामान्य रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरोत्तर उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढेही प्रयत्नशील राहणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी मनसे आपल्या पद्धतीने सातत्याने पाठपुरावा करून त्यांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत कार्यवाही सुरू केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे स्वागत केले.


