(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीकडे नगर परिषद प्रशासनाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष पुन्हा एकदा एका चिमुकल्याच्या जीवावर बेतता बेतता राहिले आहे. शहरातील कीर्तीनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी भटक्या कुत्र्याने सहा वर्षीय बालकावर अचानक झडप घालून त्याला गंभीर जखमी केले. हैदर असीम अन्सारी (वय ६, रा. कीर्तीनगर) असे या जखमी बालकाचे नाव असून, नगर परिषदेच्या या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे.
मंगळवारी (१७ नोव्हेंबर ) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हैदर कीर्तीनगर परिसरात खेळत होता. यावेळी दबा धरून बसलेल्या एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला आणि त्याचा जोरदार चावा घेतला. कुत्र्याच्या या अनपेक्षित झडपेमुळे हैदर प्रचंड भेदरून गेला आणि मदतीसाठी आक्रोश करू लागला. चिमुकल्याचा आर्त आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कुत्र्याला हुसकावून लावले. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात हैदरच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी आणि स्थानिक रहिवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. सध्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर तातडीचे उपचार आणि प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कीर्तीनगरसह रत्नागिरी शहराच्या कानाकोपऱ्यात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. यापूर्वीही शहरात अशा अनेक घटना घडल्या असताना, नगर परिषद प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहे. एखाद्या निष्पाप जिवाचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल कीर्तीनगरमधील रहिवासी विचारत आहेत. या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


