(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी)
शिकारीच्या प्रतीक्षेत जंगलमय भागात बसलेले असताना बंदूक खाली पडून गोळी सुटल्याने एकाचा मृत्यू, तर दुसरा जखमी झाल्याच्या प्रकरणात अखेर दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन शांताराम शिगवण (४२, रा. वणोशी, खोंडारणवाडी, ता. दापोली) याचा या घटनेत मृत्यू झाला, तर सुनिल महादेव पान्दे (४६, रा. वणोशी, खोंडारणवाडी) जखमी झाला.
आघारी-खोंडारण येथील धारेजवळील जंगलमय भागात ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक पूजा आदित्य हिरेमठ यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिगवण आणि सुनिल पान्दे हे दोघे जंगलमय भागात शिकारीच्या प्रतीक्षेत बसले होते. त्यावेळी सचिन याच्याकडे काडतूस भरलेली १२ बोअरची गावठी बनावटीची रायफल होती. बंदूक हाताळत असताना पायाचा धक्का लागल्याने ती खाली पडली.
दगडावर बंदूक आदळताच त्यातील काडतूस चालले. यातून सुटलेले छरे सचिनच्या शरीरात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. तर सुनिल पान्दे यांच्या उजव्या पायाला दोन छरे लागल्याने ते जखमी झाले. या घटनेनंतर दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत बंदूक बाळगणे आणि तिच्या हाताळणीसंदर्भातील बाबी समोर आल्यानंतर अखेर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्तमिश्रित माती, साधी माती, १२ बोअरची दोन जिवंत काडतुसे, एक रिकामे काडतूस आणि सुमारे २० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची सिंगल बॅरल १२ बोअर रायफल जप्त केली आहे. याशिवाय रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाइलही ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २२ हजार ३०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १०६(१), १२५ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३/२५ आणि ३/५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दाभोळ सागरी पोलिसांकडून सुरू आहे.


