(चिपळूण /रत्नागिरी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे पाग-बौद्ध कॉलनी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्ग ओलांडताना विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत असल्याने परिसरातील महिलांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या टप्प्यात उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्याने, तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी भुयारी मार्ग उभारावा, अशी मागणी महिलांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर चिपळूण शहराच्या हद्दीपासून कापसाळ विश्रामगृहापर्यंतचा सुमारे तीन किलोमीटरचा टप्पा आहे. यापैकी दोन किलोमीटर अंतरात उड्डाणपुलाचे काम झाले असले, तरी प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या उर्वरित एक किलोमीटरच्या टप्प्यात अद्याप उड्डाणपूल उभारण्यात आलेला नाही. या परिसरात उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर भरावाचे काम सुरू असल्याने पाग-बौद्ध कॉलनीतील नागरिकांची महामार्ग ओलांडताना अधिकच कोंडी होत आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकालीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका महिलांनी मांडली आहे. रत्नागिरी-निवळी येथील भुयारी मार्गाच्या धर्तीवर पाग-बौद्ध कॉलनी परिसरात पादचारी भुयारी मार्ग उभारून त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे.
माजी नगरसेविका उज्वला जाधव यांनी या समस्येची तीव्रता अधोरेखित केली. या महामार्गालगत महाविद्यालये, हायस्कूल, मराठी शाळा, जिल्हा न्यायालय, पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, सिटी सर्व्हे कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि एसटी महामंडळाच्या सुविधा आहेत. त्यामुळे या मार्गावर नागरिकांची सतत वर्दळ असते. विशेषतः विद्यार्थी आणि मोलमजुरी करणाऱ्या महिलांना महामार्ग ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता या प्रश्नावर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित एक किलोमीटरच्या टप्प्यात उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीवरही पालकमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे. मात्र, तोपर्यंत पाग-बौद्ध कॉलनीतील नागरिकांना सुरक्षितपणे महामार्ग ओलांडता यावा, यासाठी सध्या सुरू असलेल्या भरावाच्या ठिकाणीच पादचारी भुयारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगरसेविका उज्वला जाधव, मंदाकिनी मोहिते, राजेश्री जाधव, भारती सकपाळ, निधी जाधव, सुनीता जाधव, दीप्ती कदम, पर्वा जाधव, राखी जाधव, निकिता जाधव, प्रीती मोहिते, प्रतिभा सकपाळ, स्नेहा गमरे, प्रतीक्षा तांबे, उमा कदम, नीलम गायकवाड, अनिता मोहिते, ललिता मोहिते, स्मिता जाधव यांच्यासह नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राजू जाधव, डॉ. अशोक सकपाळ, प्रशांत मोहिते, राजेंद्र जाधव, तुळशीराम जाधव, विलास सकपाळ, विलास जाधव आदी उपस्थित होते.


