(दापोली / वार्ताहर)
हर्णे किनाऱ्यावर गुरुवारी सकाळी एकाच दिवशी ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉर्पोईज’ प्रजातीचे दोन मृत प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने पर्यावरण आणि सागरी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. हर्णे बंदरातील एम. एम. फिशरीजसमोर एक नर प्राणी मृतावस्थेत आढळला, तर हर्णे बायपाससमोरील समुद्रकिनाऱ्यावर या प्रजातीचे एक लहान पिल्लू मृतावस्थेत वाहून आले.
हर्णे कांदळवन विभागाचे प्रमुख फहद जमादार यांच्या निदर्शनास हा प्रकार सर्वप्रथम आला. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी बंदरात आढळलेल्या मृत प्राण्याचे शवविच्छेदन केले.
दोन्ही प्राण्यांचा मृत्यू सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहांची झालेली दुरवस्था आणि मृत्यूला झालेला मोठा कालावधी यामुळे शवविच्छेदनानंतरही मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती डॉ. लोंढे यांनी दिली. मोठ्या जहाजाचा धक्का लागणे अथवा मासेमारीच्या जाळ्यात अडकणे यामुळे या दुर्मीळ जीवांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदनासह आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मृत प्राण्यांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत खोल खड्डा करून सन्मानपूर्वक पुरण्यात आले.
फिनलेस पॉर्पोईज हा सामान्य डॉल्फिन नसून समुद्री सस्तन प्राण्यांच्या स्वतंत्र पॉर्पोईज वर्गातील जीव आहे. या प्राण्याच्या पाठीवर डॉल्फिनप्रमाणे स्पष्ट पृष्ठीय पर नसणे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या सागरकिनारी या प्रजातीच्या नोंदी यापूर्वीही आढळल्या आहेत. त्यामुळे अत्यंत दुर्मीळ असलेल्या या प्राण्यांचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होणे ही सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने गंभीर आणि चिंताजनक बाब मानली जात आहे.


