(दापोली)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियानाचे उद्घाटन दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथे गुरुवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी ग्रामपंचायत पिसईचे सरपंच श्री. वसंत येसरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा भागवत, डॉ. वैदेही जोईल, विस्तार अधिकारी श्री. निलेश गिम्होनिकर तसेच आरोग्य कर्मचारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्या, विविध आजारांबाबत मार्गदर्शन, पोषणविषयक जनजागृती तसेच कुटुंबाच्या सर्वांगीण सशक्तीकरणासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. “महिलांचे आरोग्य सक्षम असेल तर कुटुंब आणि त्यातूनच समाज सशक्त होतो” हा महत्वाचा संदेश या अभियानाद्वारे दिला जात असल्याचे यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबतची जाणीव अधिक दृढ होऊन सामाजिक व कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, अशी अपेक्षा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

