(खेड)
दापोली तालुक्यातील आष्टाची वाडी–टाळसुरे येथे धारदार सुरीने आपल्या सुनेची निर्घृण हत्या करणाऱ्या सासऱ्याला खेड येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश–१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी बुधवारी (दि. २८) हा निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी मधुकर धोंडू सणस (वय ६२, रा. आष्टाची वाडी–टाळसुरे, ता. दापोली) याला जन्मठेपेसह ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. मृत आरती अभिषेक सणस (वय ३२) या आशा सेविका होत्या. २९ मार्च २०२२ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हा खून झाला होता. आरोपी मधुकर सणस व त्यांची सून आरती हे एकाच घरात राहत होते.
घरगुती कारणांवरून तसेच कोरोना काळात आरती आशा सेविका म्हणून करत असलेल्या कामावरून आरोपीला तीव्र राग होता. या रागातूनच मधुकर सणस याने आधी सुरीला धार काढून घेत आरती यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात आरती यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खेड येथील सत्र न्यायालयात चाललेल्या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांची साक्ष तसेच शवविच्छेदन अहवाल यांचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले. सरकार पक्षातर्फे ॲड मृणाल जाडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तपासात पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, कोर्ट पैरवी पोलिस हवालदार सुदर्शन गायकवाड तसेच महिला पोलिस शिपाई श्रीमती कासार यांनी सहकार्य केले.

