(चिपळूण / वार्ताहर)
मुंबईतील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ७८ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या प्रतिष्ठित आयुर्विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्तपदी चिपळूणचे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. संतोष दाभोळकर यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिपळूणच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राचा सन्मान उंचावला असून, त्यांच्या चार दशकांच्या वैद्यकीय सेवेची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
मुंबईतील सायन येथे कार्यरत असलेले आयुर्विद्या प्रसारक मंडळ ही वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था आहे. सन १९५२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय, शिव हे मुंबईतील प्रतिष्ठित वैद्यकीय शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाने आयुर्वेद शिक्षण आणि वैद्यकीय सेवाक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यापीठाच्या अव्वल क्रमवारीत स्थान मिळविणारे हे मुंबईस्थित वैद्यकीय महाविद्यालय आहे.
सायन रेल्वे स्थानकाजवळ सहा एकरांच्या विस्तीर्ण परिसरात संस्थेचा प्रशस्त आणि सुसज्ज कॅम्पस आहे. येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त आयुर्वेदिक रुग्णालय असून, बी.ए.एम.एस. पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. गेल्या ७४ वर्षांपासून ही संस्था कुशल वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टर घडविण्याचे कार्य करीत आहे. आयुर्वेदिक वनस्पतींची समृद्धता आणि निसर्गरम्य परिसर हीदेखील संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, डॉ. संतोष दाभोळकर यांनी याच संस्थेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे या संस्थेच्या विश्वस्तपदी त्यांची निवड होणे हा त्यांच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय प्रवासातील महत्त्वाचा सन्मान ठरला आहे.
डॉ. दाभोळकर हे चिपळूण शहरालगतच्या खेर्डी येथे गेल्या ४० वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. दीर्घकाळ रुग्णसेवा करताना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक कार्यातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉक्टरांच्या ‘निमा’ या संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी तब्बल १५ वर्षे समर्थपणे सांभाळले आहे. तसेच बी.ए.एम.एस. ग्रॅज्युएट असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य आहेत.
चिपळूण वैद्य मंडळ, चिपळूण डॉक्टर असोसिएशन आणि चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन अशा विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. विविध वैद्यकीय आणि सामाजिक संस्थांमध्ये जबाबदारीची पदे सांभाळताना त्यांनी समाजसेवेचा वसा कायम जपला आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कार्याचा लाभ आयुर्विद्या प्रसारक मंडळाच्या आगामी वाटचालीस निश्चितच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. संतोष दाभोळकर यांच्या कुटुंबातही वैद्यकीय सेवेचा वारसा पुढे सुरू आहे. त्यांची कन्या डॉ. सायली दाभोळकर या एम.डी.एस. (प्रोस्थोडोन्टिस्ट) असून मुंबई येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. तर त्यांचे पुत्र डॉ. साहिल दाभोळकर हे नेरूळ येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एम.एस. (ऑर्थोपेडिक्स) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. एकाच कुटुंबातील पुढील पिढीनेही वैद्यकीय क्षेत्राची निवड करून आरोग्यसेवेचा वारसा पुढे नेणे ही अभिमानास्पद बाब आहे.
डॉ. संतोष दाभोळकर यांच्या आयुर्विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्तपदी झालेल्या निवडीबद्दल चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, उद्योजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


