(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मोबाईल टॉवरच्या सुरक्षेचा भेद करून चोरट्यांनी थेट केबिनमध्ये प्रवेश करत तीन इन्व्हर्टर बॅटऱ्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीने उभारलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरच्या ठिकाणी हा चोरीचा प्रकार घडला. यामध्ये अमर राजा कंपनीच्या तीन बॅटऱ्या चोरीस गेल्या असून त्यांची एकूण किंमत २२ हजार ५०० रुपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी मोबाईल टॉवर परिसरातील बॅटरी ठेवण्यासाठी असलेल्या केबिन रूमचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर खोलीमध्ये ठेवलेल्या अमर राजा कंपनीच्या तीन काळ्या रंगाच्या इन्व्हर्टर बॅटऱ्या चोरून नेल्या. या बॅटऱ्यांचा वापर मोबाईल टॉवरला वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत बॅकअप देण्यासाठी केला जातो. प्रत्येक बॅटरीची किंमत ७ हजार ५०० रुपये असून चोरीस गेलेल्या तीन बॅटऱ्यांची एकूण किंमत २२ हजार ५०० रुपये आहे.
या चोरीच्या प्रकारात एमएच ४८ डीसी ८६५८ क्रमांकाच्या कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. चोरीची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांची परवानगी घेतल्यानंतर विलंबाने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


