(दापोली)
युवा मोरया सामाजिक संस्थेच्या वतीने दापोली येथील आनंद फाउंडेशन संचालित बहुविकलांग गतिमंद मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्रात “मायेची ऊब” या संकल्पनेतून सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत बहुविकलांग गतिमंद मुलांना ब्लॅंकेट व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या सोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याची संधी संस्थेच्या सदस्यांना मिळाली. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य हेच या उपक्रमाचे सर्वात मोठे समाधान ठरले.
हा कार्यक्रम शिक्षक श्री. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच आनंद फाउंडेशनच्या संस्थापक रेखा बागुल मॅडम आणि महेश्वरी मॅडम या अत्यंत प्रामाणिकपणे व प्रेमाने या मुलांची काळजी घेत असल्याचे पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान विक्रांत या मुलाने सुंदर गीत सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. ही सेवा युवा मोरया सामाजिक संस्थेचे टीम सदस्य समाजसेवक संजोग शेडगे व मुकेश नांदे यांच्या विशेष संकल्पनेतून राबविण्यात आली.
युवा मोरया सामाजिक संस्था नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी व वेगळे उपक्रम राबवत आली आहे. सर्वांच्या आशीर्वाद व सहकार्यामुळेच हे सेवा कार्य शक्य होत असून भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

