(रत्नागिरी)
शहरातील प्रसिद्ध ‘हेळेकर मिठाई’चे तरुण व्यावसायिक योगेंद्र राजन हेळेकर (वय ३७) यांचे आज सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण रत्नागिरी शहरावर शोककळा पसरली असून, मित्रपरिवार आणि व्यावसायिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
जुना माळ नाका येथे ‘हेळेकर मिठाई’ हे त्यांचे मिठाईसाठी प्रसिद्ध असलेले दुकान आहे. व्यवसायात तरुण वयातच नावलौकिक मिळवतानाच, योगेंद्र हेळेकर हे एक प्रतिभासंपन्न चित्रकार म्हणूनही परिचित होते. विशेषतः गणपती उत्सवाच्या काळात त्यांनी साकारलेल्या आकर्षक आणि देखण्या मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असत. योगेंद्र हेळेकर यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांचा हसतमुख स्वभाव, शांत आणि नम्र व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी आपला मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता. त्यांच्या अकाली जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली असून, शहराने एक गुणी उद्योजक आणि हरहुन्नरी कलावंत गमावला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. आज दुपारी ४ वाजता भागोजी शेठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

