(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील धामणसे बौद्धवाडी येथील महाबोधी बुद्धविहारात वर्षावास प्रवचन मालिकेतील बारावे पुष्प उत्साहात फुलले. दिनांक ७ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमात ‘पराभवसुत्त’ या विषयावर श्रामणेर संजय कांबळे यांनी रसिक श्रोत्यांना ज्ञानमार्गाचे मौलिक मार्गदर्शन केले. भारतीय बौद्ध महासभा, गाव शाखा धामणसे आणि आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना श्रामणेर संजय कांबळे म्हणाले, धम्माचे आचरण न करणाऱ्या व्यक्तीला जीवनात पराभवाला सामोरे जावे लागते. दुष्कर्म, द्वेष, वाईट संगत, मद्यपान, आळस, पालकांचा अवमान, सत्याचा अनादर, पत्नीची फसवणूक, धर्माची अवहेलना हीच पराभवाची कारणे आहेत. पंचशील हे माणसाचे खरे मोजमाप आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा हे आपले सुरक्षाकवच आहेत.
ते पुढे म्हणाले, ज्ञानी व्यक्तीकडून ज्ञान घ्यावे, परंतु केवळ कोणी सांगतो म्हणून सत्य मानू नये. विवेकाने योग्य-अयोग्याचे परीक्षण करूनच आचरण करावे. वैराने वैर वाढते, क्रोधाने क्रोध वाढतो, मात्र शांततेतून समस्यांचे निराकरण होते. हा गौतम बुद्धांचा खरा संदेश आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी तालुकाध्यक्ष विजय मोहिते, कोषाध्यक्ष भगवान जाधव, केंद्रीय शिक्षक प्रवीण पवार, माजी तालुकाध्यक्ष रत्नदीप कांबळे, बौद्धाचार्य आदेश कांबळे, तालुका संघटक जयवंत जाधव, दीपक जाधव, सुरेश जाधव, शुभांगी कांबळे, प्रमोद जाधव, अनंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गाव शाखेचे उपाध्यक्ष शंकर जाधव, सचिव शैलेश जाधव, सहसचिव जयदीप जाधव, खजिनदार सदानंद जाधव, आदर्श महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सुचिता जाधव, ग्रामपंचायत सदस्या अनघा जाधव यांच्यासह अनेक सभासद, ग्रामस्थ व महिला मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

