(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दुकानातील किराणा सामानाचे पैसे आणि मागील उधारीची रक्कम मागितल्याचा राग मनात धरून एका ग्राहकाने किराणा दुकानदारावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना खेडशी येथे घडली. प्रथम लोखंडी सळईने खांद्यावर जोरदार प्रहार केल्यानंतर दुकानाशेजारी पडलेला चिऱ्याचा दगड उचलून दुकानदाराच्या डोक्यात घालण्यात आला. या हल्ल्यात भीमसिंह भवरसिंह पुरोहित (वय ४२, रा. खेडशी नाका, कारवांचीवाडी, रत्नागिरी) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रमेश चंद्रकांत खेत्री (वय ३८, रा. खेडशी, कारवांचीवाडी) याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास खेडशी येथील श्री सरस्वती सुपर मार्केटमध्ये ही घटना घडली. फिर्यादी भीमसिंह पुरोहित हे आपल्या मालकीच्या किराणा दुकानात व्यवसाय करत असताना आरोपी रमेश खेत्री याने दुकानात येऊन किराणा सामान खरेदी केले. यावेळी पुरोहित यांनी खरेदी केलेल्या सामानाचे पैसे तसेच यापूर्वीची थकीत उधारी देण्याबाबत विचारणा केली. मात्र, पैशांची मागणी केल्याचा राग आल्याने आरोपीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर थेट हिंसक हल्ल्यात झाले. आरोपीने दुकानाजवळ पडलेली लोखंडी सळई उचलून पुरोहित यांच्या उजव्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने दुकानाशेजारी पडलेला चिऱ्याचा दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात पुरोहित यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी रमेश खेत्री याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा दुकानातील उधारीच्या पैशांवरून सुरू झालेला वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने खेडशी परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.


