(गणपतीपुळे / वैभव पवार)
कवी केशवसुतांचे जन्मगाव आणि मराठी कवितेची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात कवितांचा अविस्मरणीय सोहळा रंगला. कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड शाखा आणि युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रावणधारा मनामनातील’ या साहित्यिक उपक्रमात बालकवी, युवाकवी आणि ज्येष्ठ कवींनी सादर केलेल्या विविधांगी कवितांमधून जणू श्रावणधाराच बरसल्या. काव्यरसिक श्रोत्यांनी या कवितांच्या सरींमध्ये चिंब भिजत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी केशवसुत स्मारकातील कवी केशवसुतांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून साहित्यिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष आबा तथा गजानन पाटील, कोमसाप मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका श्रद्धा कळंबटे, दक्षिण कोकण युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये, मालगुंड शाखा सचिव विलास राणे, मालगुंड युवाशक्ती प्रमुख अमेय धोपटकर, डॉ. संतोष केळकर, शुभदा मुळ्ये, उज्ज्वला बापट, शिरीष लिंगायत, रमानंद लिमये, रवींद्र मेहेंदळे, रोहिणी सावंत, स्मिता जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या साहित्यिक उपक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. बालकवी गटातील विद्यार्थ्यांनी निसर्ग, श्रावण, पाऊस, बालमन आणि दैनंदिन जीवनातील विविध अनुभवांवर आधारित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. स्वरचित कविता लेखन व सादरीकरणासाठी यशिका विनायक भोसले (जि. प. शाळा निवेंडी भगवतीनगर) हिने प्रथम क्रमांक मिळवला. सौमी सुशील भुते (जि. प. शाळा निवेंडी भगवतीनगर) हिने द्वितीय, तर अनुष्का मयूर पाटील (मालगुंड शाळा क्र. १) हिने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ माऊली मंदार पात्ये (मालगुंड शाळा क्र. १) आणि तन्मय प्रशांत मांडवकर (जि. प. शाळा गणपतीपुळे) यांची निवड करण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानपदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
युवा गटातील अमृता नवाथे, मालवी होरंबे, श्रुती फुटक आणि स्वरांनी गोरे यांनी आपल्या कविता प्रभावीपणे सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. युवा कवींनी आपल्या कवितांमधून प्रेम, निसर्ग, सामाजिक वास्तव, संवेदना आणि तरुणाईच्या भावविश्वाचे विविध पैलू उलगडले.
ज्येष्ठ कवींच्या विभागात श्रद्धा कळंबटे, विलास राणे, रोहिणी सावंत आणि उज्ज्वला बापट यांनी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या अनुभवसंपन्न आणि आशयघन काव्य सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळी उंची मिळाली. शब्द, भावना आणि संगीत यांचा सुरेख मिलाफही यावेळी अनुभवायला मिळाला.
गिरीश जोशी आणि हर्ष बोंडले यांनी हार्मोनियम व तबल्याची सुरेल साथ देत कवी अमेय धोपटकर यांच्या कविता सादर केल्या. काव्य आणि संगीताच्या या संगमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. सहभागी सर्व कवी आणि कलाकारांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि लेखणी देऊन गौरव करण्यात आला.
कवी केशवसुतांच्या भूमीत नव्या पिढीला कविता लेखन व सादरीकरणाची प्रेरणा मिळावी, बालकवी आणि युवा कवींना व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच ज्येष्ठ साहित्यिकांच्या अनुभवाचा लाभ नव्या पिढीला मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम साहित्यप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय धोपटकर आणि विलास राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड शाखेचे पदाधिकारी तसेच कवी केशवसुत स्मारक समिती आणि वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

