(चिपळूण/ रत्नागिरी)
शांत आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या चिपळूण शहरालगतच्या वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात सांगली जिल्ह्यातील एका तरुणाची डोक्यात जांभा दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवारी) पहाटे उघडकीस आली. या परिसरातील एका टपरीच्या मागील बाजूस तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण चिपळूण शहर आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
भरवस्तीच्या आणि रेल्वे स्टेशनसारख्या नेहमी गजबजलेल्या नाक्यावर घडलेल्या या रक्तरंजित थरारामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिपळूण पोलिसांसह परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) तथा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक थोरात हे देखील आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपासाची चक्रे युद्धपातळीवर फिरवली आहेत.
नवनाथ कांबळे असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून, पोटापाण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात तो कोकणात आला होता. चिपळूणमधील वालोपे येथे रेल्वे सेवेत कार्यरत असलेल्या आपल्या नातेवाइकाकडे तो वास्तव्यास होता. लोटे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत तो प्रामाणिकपणे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. शांत स्वभावाचा आणि आपल्या कामाशी काम ठेवणारा तरुण अशी त्याची परिसरात ओळख होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवनाथ नेहमीप्रमाणे रात्रपाळीच्या कामावर जाण्यासाठी वालोपे येथील घरून बाहेर पडला होता. मात्र, तो कामाच्या ठिकाणी पोहोचलाच नाही आणि काही तासांतच त्याच्या क्रूर हत्येची बातमी समोर आल्याने त्याच्या नातेवाइकांना व सहकाऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरातील एका टपरीच्या मागील बाजूला नवनाथचा मृतदेह आढळून आला. हल्लेखोरांनी अत्यंत निर्दयीपणे कोकणातील वजनदार जांभा दगडाचा वापर करून त्याच्या डोक्यावर वर्मी घाव घातले. डोक्याला गंभीर मार लागल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
सकाळी हा प्रकार उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही वेळातच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तथा परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित थोरात हे देखील आपल्या विशेष पथकासह वालोपे येथे दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान
नवनाथ कांबळे याचा कोणाशी वाद होता का, लुटमारीच्या उद्देशाने त्याची हत्या झाली की यामागे अन्य काही वैयक्तिक कारण आहे, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. रात्री नऊ वाजता घराबाहेर पडल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात आला आणि नेमक्या कोणत्या वेळेस त्याच्यावर हल्ला झाला, याचा तांत्रिक तपासही सुरू करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन नाका परिसरात घडलेल्या या अमानुष घटनेमुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि लोटे एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. या निर्घृण हत्येचा छडा लावून मारेकऱ्यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान आता पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.


