(चिपळूण)
तालुक्यातील खेर्डी-भुरणवाडी येथे बंद घर फोडून एका चोरट्याने तब्बल ५ लाख किमतीचे दोगिने लंपास केल्याची घटना सोमवारी घडली होती. या चोरीचा छडा लावताना पोलिसांनी अवघ्या दोन तासात एका १५ वर्षीय अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरलेले दागिनेही हस्तगत केले आहेत.
याबाबतची फिर्याद विनायक विठ्ठल खेडेकर (३४, रा. खेर्डी-भुरणवाडी) यांनी दिली आहे. खेडेकर हे सकाळी ११:३० ते रात्री ११ यावेळेत घर बंद करुन कामानिमित्त घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने बंद घरात प्रवेश करुन कपाटातील ५ लाख ३७ हजार किमतीचे दागिने लंपास केले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विनायक खेडेकर घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तात्काळ चिपळूण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चोरीचा छडा लावण्याच्यादृष्टीने तपासाची चक्रे वेगवान फिरवली. त्यानुसार गोपनीय माहिती व चहुबाजूच्या तपासाअंती चोरीमध्ये त्या परिसरातील एक १५ वर्षीय अल्पवयीन चोरटा असल्याचे स्पष्ट होताच त्याला ताब्यात घेतले.
चोरट्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने हे दागिने त्याच्या घरातच लपवल्याचे सांगितले. पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, हेडकॉन्स्टेबल बुषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे यांच्या पथकाने केली.