( सिंधुदुर्ग / कुडाळ )
भरदिवसा बँकेत घुसून महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज (मंगळवारी) दुपारी कुडाळ शहरातील पानबाजार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत घडली. मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला. रोकड घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित तरुणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास एक तरुण बँकेत दाखल झाला. त्याने अचानक एका महिला कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून तिला धमकावले. त्यानंतर तिच्यावर दबाव टाकत तिला कॅश स्टॉक ठेवलेल्या ठिकाणी नेले. तेथील लाखो रुपयांची रोकड पिशवीत भरण्यास त्याने सुरुवात केली. या प्रकारामुळे बँकेत आरडाओरड सुरू झाली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.
बँकेतील गोंधळाचा आवाज ऐकून बाहेर जमलेल्या नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप केला. रोकड घेऊन संशयित तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत ताब्यात ठेवले आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक गुरु पाडावे आणि प्रमोद काळसेकर यांच्यासह पोलीस पथकाने बँकेत धाव घेतली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. बँकेतील रोकड सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या दरोड्याच्या प्रयत्नात संशयितासोबत आणखी कोणी सहभागी होते का, याचा पोलीस तपास करीत आहेत. बँकेतील सीसीटीव्ही चित्रण तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे घटनेचा सध्या तपास सुरू आहे.
महिला कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून भरदिवसा बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याने कुडाळ शहरात खळबळ उडाली आहे. मात्र, बँक कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि नागरिकांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.


